टिळक रस्त्यावर भूमिगत सांडपाणी वाहिन्यांसाठी ठेकेदाराकडून करण्यात येणाऱ्या खोदकामात शुक्रवारी मध्यरात्री उच्चदाब भूमिगत वीजवाहिनी तोडण्यात आली. त्यामुळे सदाशिव पेठ, टिळक रस्ता आणि नवी पेठेतील बहुतांश भाग अंधारात बुडाला. पर्यायी व्यवस्थेतून रात्री काही भागांत वीज आली असली, तरी सुमारे १८०० ग्राहकांची वीज दीर्घकाळ गायब होती. रात्रभर दुरुस्तीचे काम करून शनिवारी दुपारच्या सुमारास या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

टिळक स्मारक मंदिराजवळ भूमिगत सांडपाणी वाहिन्या बदलण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी जेसीबीने खोदकाम करण्यात येत आहे. त्यामध्ये शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास महावितरणची भूमिगत वीजवाहिनी तोडण्यात आल्याने सदाशिव पेठ, टिळक रोड आणि नवी पेठ परिसरातील २५ रोहित्रांवरील वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणने सर्वप्रथम २५ पैकी १२ रोहित्रांचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरू केला. परंतु, १३ रोहित्रांवरील सुमारे १८०० ग्राहकांना पर्यायी वीजपुरवठा करणे शक्य झाले नाही. त्यामुळे या ग्राहकांना रात्र अंधारातच काढावी लागली.

महावितरणकडून तातडीने भूमिगत वाहिनीची तपासणी करण्यात आली आणि तोडलेल्या वीजवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. यामध्ये दोन ठिकाणी जोड द्यावे लागले. दुरुस्ती आणि चाचणी झाल्यानंतर शनिवारी दुपारच्या सुमारास सर्वच रोहित्रांवरील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.