पुणे : संशोधनातील प्रयोगांमध्ये वापरण्यात येणारे ससे, उंदीर अशा प्राण्यांची पैदास करण्याच्या दृष्टीने मध्यवर्ती प्राणिगृहाची निर्मिती करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. मध्यवर्ती प्राणिगृहाची सुविधा उभारणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे राज्य विद्यापीठांमध्ये एकमेव विद्यापीठ ठरणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी मध्यवर्ती प्राणिगृह इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई, कार्यकारी अभियंता विजय ढवळे, मुख्य वसतिगृह प्रमुख डॉ. वर्षा वानखेडे, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, डॉ. धोंडीराम पवार, प्रा. संदीप पालवे, बागेश्री मंठाळकर, सागर वैद्य, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, डॉ. संगीता जगताप, अधिसभा सदस्य प्रसेनजित फडणवीस या वेळी उपस्थित होते.

विद्यापीठात उभारण्यात येणाऱ्या मध्यवर्ती प्राणिगृहात उंदीर आणि ससे अशा प्रयोगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांना संशोधनासाठी ठेवण्यात येईल. या प्राण्यांची पैदास केली जाईल. प्राण्यांच्या प्रयोगासाठी अशा अत्याधुनिक सुविधेमुळे जीवशास्त्र, जैववैद्यकीय विज्ञान आणि औषधनिर्माण क्षेत्रामध्ये वैज्ञानिक संशोधनाचा एकूण प्रभाव वाढणार आहे. तसेच ही सुविधा उद्योगांसह सरकारी आणि खासगी संस्थांना संशोधन सहकार्यासाठी खुली असणार आहे. या आंतरविद्याशाखीय सहकार्यासह संशोधनाच्या गुणवत्तेला राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय निधी संस्थांकडून मिळेल. तसेच, केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच नाही, तर राज्यभरातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना या सुविधेचा उपयोग होईल, असे विद्यापीठाच्या जैवविज्ञान प्रयोगशाळेच्या संचालिका प्रा. स्मिता झिंजर्डे, प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. नरहरी ग्रामपुरोहित यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची उभारणी

विद्यापीठात राज्यातील आणि देशातील विविध भागांतून विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय होण्यासाठी आधुनिक सुविधा असलेले वसतिगृह विद्यापीठात उभारण्यात येणार आहे. या वसतिगृहाचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.