पुणे: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी, बारावीच्या निकालात शहरातील शाळांतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. त्यात अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले.

ज्ञानप्रबोधिनी शाळेचे सर्व ७८ विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण झाले असून, शाळेचा निकाल १०० टक्के लागला. त्यात आदिजा सुतार हिने ९८.४ टक्के गुणांसह शाळेत अव्वल स्थान मिळवले. प्रशालेतील २८ विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवल्याचे प्राचार्य डॉ. मिलिंद नाईक यांनी सांगितले. दिल्ली पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागला.

शाळेतील ३०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात १७० मुली, १३८ मुले, आठ विशेष विद्यार्थ्यांचा समावेश होता. केशवनगर आणि मुंढवा येथील ऑर्बिस स्कूलचा निकालही १०० टक्के लागला. त्यात केशवनवगर शाखेतील लक्षिता पटनायकने दहावीच्या परीक्षेत ९९.४ टक्के गुण मिळवले. तर अन्या बागी, स्निग्धा रणजित जाधव यांनी ९९.२ टक्के, सच्चित शंकरन, शौर्य सिंग, टी. इशाना यांनी संयुक्तरित्या ९८.८ टक्के गुण प्राप्त केले.

परीक्षेसाठी केलेली मेहनत, कुटुंबियांनी दिलेले प्रोत्साहन, शिक्षकांच्या मार्गदर्शनाने हे यश शक्य झाल्याची भावना लक्षिताने व्यक्त केली. तर मुंढवा शाखेतील विविक्ता अय्यर या विद्यार्थिनीने ९८.४ टक्के, कवनिका सेल्वाकुमार, यश भाटिया यांनी ९८ टक्के गुण मिळवले. बारावीच्या निकालात केशवनगर शाखेत विज्ञान शाखेत प्रियंका आनंदने ९५.२ टक्के, वाणिज्य शाखेत अद्वैता करने ९७.२ टक्के, कला शाखेत गायत्रीदेवी जयचंद्रनने ९८.६ टक्के, मुंढवा शाखेत विज्ञान शाखेत चैतन्य तिवारीने ९३ टक्के, वाणिज्य शाखेत आयरिसा बिंदू शफीकने ९६ टक्के गुण मिळवले.

बालेवाडी येथील ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. विद्यार्थ्यांची मेहनत, चिकाटी आणि शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थी यशस्वी ठरल्याचे प्राचार्या मुनमुन चक्रवर्ती यांनी सांगितले. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाअंतर्गत आर्मी पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. बारावीत वाणिज्य शाखेतील साची ओबेरॉय हिने ९९ टक्के गुण मिळवत अग्रस्थान पटकावले. तर दहावीमध्ये कीर्ती मोंगिया आणि सोमक देबनाथ यांनी संयुक्तरित्या ९७.८ टक्के गुण मिळवले.

संस्कृती समूहाच्या भुकुम, वाघोली, उंड्री येथील शाळांनी यश मिळवले. श्रवण अक्षम असलेल्या अथर्व फाफळे या विद्यार्थ्याने बारावीत ७५.४ टक्के गुण मिळवले. तर भुकुम शाखेतील आमोदिनी बापट या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत ९८.८ टक्के गुण पटकावले. विशेष म्हणजे, भरतनाट्यम् नृत्यात नैपुण्य मिळवलेल्या आमोदिनीने केंद्र सरकारच्या सांस्कृतिक प्रतिभा शोध योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळवली आहे. ‘भरतनाट्यम आणि अभ्यास यांचा समतोल राखला. त्यामुळे जिद्द आणि कामगिरी साध्य करता येऊ शकते हे दाखवून दिल्याचा आनंद आहे,’ अशी भावना तिने व्यक्त केली.