पुणे प्रतिनिधी: पुणे महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांनी फेरीवाल्यां विरोधात कारवाई करतेवेळी वडापाव स्टॉलवर लाथ मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यावर ट्वीट करत भूमिका मांडताना म्हणाल्या की, पुणे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांचं वागणं पाहून सखेद आश्चर्य वाटलं. महापालिकेचे अधिकारी हे संवेदनशील असायला हवेत. त्यांना तळागाळातील जनतेच्या कष्टाची जाण असायला हवी. सदर अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. अशी मागणी केली.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागणीबाबत अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांना विचारले असता ते म्हणाले की, “पुणे शहरातील अनेक भागात आमचे अधिकारी, कर्मचारी कारवाईसाठी जातात. त्यावेळी अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग घडतात. अनाधिकृत फेरीवाले आम्हाला शिवीगाळ करतात. आम्ही त्यांना वारंवार सांगून देखील अतिक्रमण हटविले नाही. तर त्यांच्यावर कारवाई करीत आहोत. तसेच जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या संबधित व्यक्तीला वारंवार सांगून देखील स्टॉल काढला नाही. अतिक्रमण काढताना ती कृती झाली. तसेच ती जर माझी चूक असेल तर माझ्यावर जरूर कारवाई करावी. पण या प्रकरणी वेगळं वातावरण निर्माण केले जात आहे.”

आणखी वाचा- VIDEO: लाथ मारून अन्नाचं भांडं पाडलं; मनपा अधिकाऱ्याच्या कृत्यावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते पुढे म्हणाले, “सुप्रिया ताई तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात आणि आम्ही देखील अधिकारी आहोत. त्यामुळे ज्यावेळी तो व्हिडीओ समोर आला. त्यादरम्यान तुम्ही आमच्याकडे चौकशी करणे अपेक्षित होते. पण तुम्ही ट्वीट केले त्यामुळे एकच वाटते की, कोणतही ट्वीट करताना दुसरी बाजूदेखील पहिली पाहिजे.” अशी भूमिका मांडत सुप्रिया सुळे यांना अधिकाऱ्यांनी सुनावले. तसेच पुणे शहर अतिक्रमण मुक्त होण्यासाठी यापुढेदेखील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.