scorecardresearch

कसब्याची उमेदवारी न मिळाल्याने शैलेश टिळकांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले,“पुण्यातील ताईंच्या सहकार्‍यांनी..”

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

कसब्याची उमेदवारी न मिळाल्याने शैलेश टिळकांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले,“पुण्यातील ताईंच्या सहकार्‍यांनी..”
कसब्याची उमेदवारी न मिळल्याने शैलेश टिळकांनी व्यक्त केली नाराजी (image – loksatta team/graphics)

पुणे : “२० वर्षे बरोबरीने काम करणाऱ्या पुणे शहरातील ताईंच्या सहकार्‍यांनी जाणीव ठेवायला पाहिजे होती,” अशी भूमिका कसब्याची उमेदवारी न मिळाल्यानंतर मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी मांडली आहे. शैलेश यांनी सदर विधान करत पक्षातील नेत्यांबाबत उघडउघड नाराजी व्यक्त केली.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीकरिता आज भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

हेही वाचा – पुणे : प्राप्तिकरासाठी नव्या प्रणालीचा नागरिकांना फायदा, जयंत सिन्हा यांचा दावा

हेही वाचा – बारामती मतदारसंघात भाजपची अशीही मतपेरणी

ताईंनी शेवटच्या श्वासापर्यंत पक्ष निष्ठा जपली, मात्र…

मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, “मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुढील निवडणुकीचा काळ साधारणपणे सव्वा वर्षाचा राहिला आहे. तसेच त्यांची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्याची संधी कुटुंबीयांना द्यावी, अशी इच्छा पक्षाकडे बोलून दाखवली होती. तसेच, आजवरच्या घटनांमध्ये कुटुंबीयांपैकी एकाला संधी देण्यात आल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे. हेच आम्हाला देखील वाटत होते. तसेच ताईंनी शेवटच्या श्वासापर्यंत पक्ष निष्ठा जपली, मात्र पक्षाच्या नेतृत्वाने वेगळा विचार केला असून, हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 14:59 IST
ताज्या बातम्या