पुणे : ‘राज्य सरकारने आरक्षणाबाबत मराठा आणि ओबीसी जातींच्या नेमलेल्या दोन उपसमित्यांची गरज होती का,’ असा सवाल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला. ‘या विषयात राजकारण न करता सामाजिक ऐक्य आणि सर्वांनी एकत्र येऊन कटुता कमी कशी करता येईल, हे पाहिले पाहिजे,’ अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, ‘राज्य सरकाने दोन जातींच्या उपसमित्या नेमल्या आहेत. त्यामध्ये एकजण दुसऱ्याचा विचार करणार नाही. असे करण्याची आणि दोन वेगवेगळ्या उपसमित्या नेमण्याची गरज होती का?’
‘राज्यातील सामाजिक वातावरण बिघडत आहे. बंजारा समाजाने मोर्चा काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी आदिवासी समाजाचा मोर्चा झाला. त्यामुळे या विषयात राजकारण न करता सामाजिक ऐक्य साधण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच सर्वांनी एकत्र येऊन कटुता कमी कशी करता येईल, हे पाहणे गरजेचे आहे,’ असे पवार म्हणाले.
‘हैदराबाद गॅझेट वाचले नव्हते’
हैदराबाद गॅझेटविषयी शरद पवार म्हणाले, ‘हे गॅझेट कधीच वाचले नव्हते. तो भाग महाराष्ट्रात नव्हता. त्याच्या खोलात आम्ही कधी गेलो नाही. आता प्रत्येक जातीची वेगळी मागणी असेल, तर ऐक्य कसे होईल?’
नुकसानीचे पंचनामे सुरू करा
‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोलापूरमध्ये यापूर्वी रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याचे कधीही पाहिले किंवा ऐकले नव्हते. लोणी काळभोरमध्येही घरांमध्ये पाणी गेले. राज्यात ऊस आणि अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब नुकसानीचे पंचनामे सुरू करावेत. केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी,’ असेही पवार म्हणाले.
‘अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास भयंकर स्थिती’
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यात येत असल्याबाबत विचारणा करण्यात आली असता पवार म्हणाले, ‘राज्य सरकारने तेथील राज्य सरकारशी याबाबत चर्चा केली पाहिजे. अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास सोलापूर आणि कोल्हापूर भागात भयंकर स्थिती निर्माण होईल.
‘निवडणुकांबाबत चांगला निर्णय’
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पवार म्हणाले, ‘या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय चांगला आहे.