पुणे : ‘काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये हल्ला झाला. शेजारील देशाने अराजकता माजविली. पण, काश्मिरी जनतेने त्यांना कधीच साथ दिली नाही. काश्मिरी लोक शेजारील देशाबरोबर जाण्याचा कधीही विचार करणार नाहीत. त्यामुळे काश्मिरी जनतेसह तेथील मुस्लिमांसाठी सकारात्मक विचार झाला पाहिजे,’ असे मत ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.

सरहद संस्थेच्या सरहद ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये विजय दुर्गाप्रसाद धर यांच्या नावे उभारलेल्या ॲम्फी थिएटरचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. व्यासपीठावर विजय धर, किरण धर, संतसिंग मोखा, ‘सरहद’चे संस्थापक संजय नहार, शैलेश वाडेकर उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘शेजारी देशांनी काहीही केले, तरी काश्मिरी जनता त्यांना कधीच साथ देणार नाही. काश्मिरी जनतेचे देशसेवेत मोठे योगदान आहे. शेजारी देशाने तेथे अराजक माजवले, हिंसाचार घडवला; पण काश्मिरी जनतेने आपण देशाचा अविभाज्य भाग असल्याचे वेळोवेळी सिद्ध केले आहे. काश्मिरी जनतेच्या या प्रयत्नांना ‘सरहद’सारख्या संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. काश्मीरसोबत सारा देश उभा आहे, हे ‘सरहद’ने दाखवून दिले आहे.’

‘पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तातडीने विधिमंडळाची बैठक बोलावली. त्यात, आम्ही देशासोबत आहोत; तसेच पहलगामवर झालेल्या हल्ल्याचे आम्ही समर्थन करीत नाही. काश्मीरचे रक्षण करण्यासाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करू, असा ठराव मंजूर केला. काश्मीर हा आपल्यासाठी हिरा आहे,’ असेही पवार म्हणाले.

‘देशातील काश्मीरचा प्रश्न सुटत नाही. त्याबाबत मी विजय धर यांना सल्ला विचारला होता. त्या वेळी त्यांच्या सल्ल्यानुसार, मी काश्मीरमधील लाल चौकात गेलो होतो. आमच्या वेळी काश्मीरमध्ये शांतता होती. आता वातावरण बिघडले आहे. सत्ताधाऱ्यांनी या परिस्थितीचे आत्मचिंतन करायला हवे. गेली १२-१३ वर्षे आम्ही सत्तेपासून दूर आहोत. आपल्याला देश चालवावा लागणार आहे, याचा विचार करून पक्षीय राजकारण करू नये. आम्हाला जेवढे करता आले तेवढे आम्ही केले,’ असे शिंदे यांनी सांगितले. संजय नहार यांनी प्रास्ताविक केले. धर यांनीही मनोगत व्यक्त केले.