पुणे : भाजप सत्तेत आल्यापासून आठ वर्षात १२१ नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विविध विरोधी पक्षांच्या सरकारामधील १४ मंत्री, २४ खासदार, २१ आमदार यांच्यासह ७ माजी खासदार, ११ माजी आमदारांचा समावेश आहे. काँग्रेस प्रणित युपीए काळातील दहा वर्षात २६ नेत्यांवर कारवाई झाली. त्यामध्ये पाच काँग्रेस नेत्यांचा समावेश असून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या केवळ तीन नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यावरून भाजप राजकीय सुडापोटी कारवाई करत असल्याचे स्पष्ट झाले असून कोणत्या नेत्यावर कारवाई करायची, याचे आदेश भाजप कार्यालयातून जात आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केला.

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईंसंदर्भात रोहित पवार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत राजकीय द्वेषातून कारवाई केली जात असल्याचा आरोप केला होता. तसेच सत्तेतील काही नेत्यांच्या गैरव्यवहाराची प्रकरणे आपल्याकडे असून विधिमंडळात किंवा जनतेच्या दरबारात त्याची पोलखोल केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच याप्रकरणी अटक होईल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन ईडीकडून गेल्या १८ वर्षात झालेल्या कारवाईचा तपशील मांडत रोहित पवार यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा… नीलेश लंकेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाच्या अफवा?

काँग्रेस प्रणित युपीए सरकार असताना २००४ ते २०१४ या दहा वर्षात ईडीने २६ नेत्यांवर कारवाई केली. त्यामध्ये काँग्रेसमधील पाच तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या तीन नेत्यांचा समावेश होता. यावरून काँग्रेसच्या सत्ताकाळात राजकीय सूडबुद्धीने ईडी कारवाई होत नव्हती हे स्पष्ट होते. २०१४ ते २०२२ या काळात १४७ नेत्यांची चौकशी ईडीकडून करम्यात आली. त्यामध्ये ८५ टक्के विरोधी पक्षाचे नेते होते. २०२४ नंतर १३१ नेत्यांची चौकशी झाली. त्यामध्ये काँग्रेसचे २४, तृणमूल काँग्रेसचे १९, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ११, शिवसेनेच्या ८ नेत्यांबरोबरच डीएमके ६, बीजेडीचे , बसप, सप आणि टीडीपीच्या प्रत्येकी पाच, आपच्या तीन नेत्यांचा समावेश होता. भाजपने गेल्या आठ वर्षात १२१ नेत्यांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विविध विरोधी पक्षाच्या सरकारमधील १४ मंत्री, २४ खासदार, २१ आमदारांसह सात माजी खासदार आणि ११ माजी आमदारांचा समावेश आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा… कात्रज घाटात वणवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते म्हणाले की, ईडीकडून कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये एकाही भाजप नेत्याचा समावेश नाही. त्याउलट ज्या विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजप प्रवेश केला त्यांची चौकशी थांबविली जात आहे. हसन मुश्रिफ, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव ही त्याची काही उदाहरणे आहेत. अनेक वेळा ईडी कोणावर कारवाई करणार, हे भाजपच्या नेत्यांना माहिती असते. त्यांच्याकडून तशा धमक्याही दिल्या जातात. कोणत्या नेत्यावर कारवाई करायची, याचे आदेश भाजप कार्यालयातून जात आहेत. ईडीची कारवाई म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीला उभे राहू नका, अशी अप्रत्यक्ष धमकी आहे.