पुणे : पुणे रेल्वे स्थानकातील पायाभूत सुविधांच्या अभावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (उद्धव ठाकरे) आक्रमक भूमिका घेत रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. स्थानक परिसरात पायाभूत सुविधांची कमतरता असल्याची कबुली रेल्वे अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला. दरम्यान, या कालावधीत प्रवाशांना सुविधा न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी दिला.
मध्ये रेल्वे विभागाच्या पुणे रेल्वे स्थानकातील फलटांवर प्रवाशांसाठी असलेल्या असुविधांबाबत दै. ‘लोकसत्ता’ने गुरुवारी (२७ मार्च) ‘रेल्वे स्थानकात फलटांवर गैरयोय’ या शिर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेत तातडीने सुविधांची अंमलबजावणी करण्याचे निवेदन देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
त्यामुळे रेल्वे स्थानकातून दिवसभरात लाखो प्रवासी प्रवास करत असतात. या प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असताना रेल्वे स्थानकाची परिस्थिती ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी परिस्थिती झाली आहे. तत्कालीन व्यवस्थापक इंदू दुबे यांनी देखील रेल्वे स्थानक परिसरात १२० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र अद्याप कुठलीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे तातडीने सुरक्षितता निश्चित करून प्रवाशांना मुलभूत सुविधांबाबत अनेक मागण्यांबाबत रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले आहे.
प्रमुख मागण्या काय ?
- प्रवाशांसाठी पुरेपूर आसन व्यवस्था करावी
- उन्हाळा असल्याने मोफत पाण्याची व्यवस्था करावी
- स्थानकात उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे
- अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी असलेले आणि ताडीवाला रस्त्यारील प्रवेशद्वारावर रेल्वे सुरक्षा पोलीस बल कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी
- रेल्वे परिसरात पोलीसांची गस्त वाढवावी
- मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरीक्त इतर मार्ग बंद करावेत
- महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लोहमार्ग पोलिसांनी उपाययोजना कराव्यात.
रेल्वे स्थानकात असुविधा असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थानकावर घेऊन जात वस्तुस्थिती दाखवून दिली. दरम्यान, रेल्वे परिसरातील सुरक्षितता आणि प्रवाशांसाठी असणाऱ्या सुविधांबाबतच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. आठ दिवसात सुविधांची अंमलबजावणी झाली नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. – संजय मोरे, शहरप्रमुख, शिवसेना (उद्धव ठाकरे)