scorecardresearch

सोसायट्यांची जागा अद्यापही बिल्डरच्या नावे – पुण्यातील १३ हजार ४६४ सोसायट्यांचे मानीव अभिहस्तांतरण बाकी

प्रलंबित संस्थांचे मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार विभाग प्रयत्नशील आहे, असे पुणे शहराचे जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांनी सांगितले.

सोसायट्यांची जागा अद्यापही बिल्डरच्या नावे – पुण्यातील १३ हजार ४६४ सोसायट्यांचे मानीव अभिहस्तांतरण बाकी
संग्रहित छायाचित्र

पुणे : शहरात १९ हजार २९ नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. यापैकी २१२५ संस्थांना मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) आवश्यक नाही. मानीव हस्तांतरणासाठी केवळ ३६४१ प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यापैकी ३४४० प्रस्तावावर कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून उर्वरित २०१ प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे पुण्यातील १३ हजार ४६४ सोसायट्यांचे अद्यापही मानीव अभिहस्तांतरण बाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मानीव अभिहस्तांतरण प्रकरणाबाबत असलेल्या अडचणी सोडविण्याकरिता गठित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ही बाब समोर आली आहे.

नोंदणी विभागाच्या वतीने मानीव हस्तांतरण १८२६ दस्त नोंदी झाल्या आहेत. विकसकाने १४५७ संस्था अभिहस्तांतरण करून दिल्या आहेत. प्रलंबित संस्थांचे मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार विभाग प्रयत्नशील आहे, असे पुणे शहरचे जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांनी सांगितले.गृहनिर्माण संस्थांनी संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तथा सक्षम प्राधिकारी यांच्या कार्यालयाकडे मानीव अभिहस्तांतरणाबाबतचा अर्ज विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा. मानीव अभिहस्तांतरणासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या अतिशय कमी करण्यात आली असून सदनिकाधारकांनी आवश्यक कागदपत्रे संस्थेकडे उपलब्ध करून दिल्यास या प्रक्रियेला गती येईल. अपार्टमेंट डिड झालेल्या वैयक्तिक सदनिकाधारकांची नावे मालमत्ता पत्रकावर नोंद घेण्याबाबत सक्षम प्राधिकारी यांना सूचना देण्यात येत आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी सांगितले.

हेही वाचा : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अभियंत्याची १५ लाखांची फसवणूक

नवीन गृहनिर्माण प्रकल्पांच्या अनुषंगाने मानीव अभिहस्तांतरणाबाबत सहकार विभागाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. जुन्या गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत या प्रक्रियेला गती देण्यासाठी सहकार विभागाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसेच याकामी नोंदणी विभागाची मदत घ्यावी. गृहनिर्माण संस्थांना मानीव अभिहस्तांतरणाबाबतची माहिती देण्यात यावी. मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया ही सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब असून गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरणाबाबत पाठपुरावा करून असे प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत. – संजय तेली, निवासी उपजिल्हाधिकारी

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Societies still in name of builders pending transfer of 13464 societies in pune print news tmb 01

ताज्या बातम्या