शनिवारवाडय़ातील ध्वनिप्रकाश कार्यक्रम तीन महिन्यांत सुरू होणार

या योजनेसाठी पालिकेच्या विद्युत विभागाने तीन कोटी रुपयांचे साहित्य आधीच खरेदी करून ठेवले आहे. मात्र पुरातत्त्व खात्याची परवानगी नसल्यामुळे हे साहित्य वापराअभावी तसेच पडून आहे.

शनिवारवाडय़ातील ध्वनिप्रकाश योजना येत्या तीन महिन्यांत पुन्हा सुरू केली जाईल, असे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या योजनेसाठी पालिकेच्या विद्युत विभागाने तीन कोटी रुपयांचे साहित्य आधीच खरेदी करून ठेवले आहे. मात्र पुरातत्त्व खात्याची परवानगी नसल्यामुळे हे साहित्य वापराअभावी तसेच पडून आहे.
शनिवारवाडा येथे ध्वनिप्रकाश कार्यक्रम सन २००१ मध्ये सुरू करण्यात आला. हा कार्यक्रम सध्या सुरू नाही. महापालिकेच्या अंदाजपत्रकात गेल्या वर्षी या कार्यक्रमासाठी जे साहित्य खरेदी करावे लागणार आहे, त्याकरिता चार कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्या तरतुदीनुसार विद्युत विभागाने ध्वनिप्रकाश कार्यक्रमासाठी आवश्यक साहित्याची तीन कोटींची खरेदी केली. सहा महिन्यांपूर्वी हे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. शनिवारवाडा पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असल्यामुळे तेथील कोणत्याही कार्यक्रमासाठी वा कामासाठी पुरातत्त्व खात्याची परवानगी लागते. तशी परवानगी न घेताच महापालिकेने साहित्य खरेदी केल्यामुळे ते वापराअभावी पडून आहे. आधी परवानगी घेऊन हे साहित्य का खरेदी करण्यात आले नाही, असा प्रश्न त्यामुळे विचारला जात आहे.
शनिवारवाडय़ातील या कार्यक्रमबाबत शुक्रवारी बैठक झाली. पुरातत्त्व खात्याचे अधिकारीही या वेळी उपस्थित होते. महापौर दत्तात्रय धनकवडे, पालकमंत्री गिरीश बापट, स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम, सभागृहनेता बंडू केमसे, आयुक्त कुणाल कुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ध्वनिप्रकाश कार्यक्रम महापालिकेने पुन्हा सुरू करण्याबाबत विचार विनिमय झाला. शनिवारवाडय़ात जो कार्यक्रम सादर केला जाणार आहे, त्याची संहिता लेखन करण्यासाठी डेक्कन कॉलेजमधील पाच जणांची समिती नेमली जाणार असून त्यासाठी कॉलेजकडून नावे मागवण्यात आली असल्याचे महापौरांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. कार्यक्रमासाठीची एकूण आसनक्षमता शंभर एवढी आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sound and light show shaniwar wada pmc