पुणे : राज्यात वेळेपूर्वीच दाखल झालेल्या र्नैऋत्य मोसमी पावसाचा कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत जोर कमी झाला आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे उन्हाचा चटका वाढला असून, कमाल तापमान सरासरी तीन ते चार अंशांनी वाढून ३५ ते ४० अंश सेल्सिअसवर गेले आहे.

जळगाव, अमरावती आणि चंद्रपुरात सोमवारी (१० जून) दाखल झालेला मोसमी पाऊस तिथेच रेंगाळला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसाची प्रगती थांबली आहे. मोसमी वाऱ्याचा जोर कमी झाला असून, हवेतील बाष्पाचे प्रमाणही कमी झाल्यामुळे कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत पावसाने उघडीप घेतली आहे. राज्याच्या बहुतेक भागांत मोसमी पाऊस पोहोचला असला, तरीही स्थानिक तापमानवाढीमुळे हवेतील बाष्पाचे ढगांत रूपांतर होत आहे. त्यामुळे मेघगर्जना, वादळी वारे वाहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

हेही वाचा >>>ओपन हार्ट सर्जरी टाळून बदलली महाधमनीची झडप! टावी प्रक्रियेद्वारे ८३ वर्षीय रुग्णावर उपचार

आकडेवारीनुसार ‘राज्यात २० टक्के अधिक पाऊस’ देशात एक जून ते पंधरा जूनपर्यंत सरासरी ६१.१ मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात यंदा ५२.१ मिमी पाऊस पडला आहे. देशात पंधरा जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार १६ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात या काळात सरासरी ७६.२ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात ९१.७ मिमी पाऊस पडला आहे. राज्यात सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरीत सरासरीपेक्षा २८ टक्के, धाराशिवमध्ये २६ टक्के, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४० टक्के, चंद्रपुरात ४४ टक्के, गडचिरोलीत ३० टक्के आणि गोंदियात ५७ टक्के कमी पाऊस पडला आहे. किनारपट्टीवरही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले. रविवारी कोल्हापूर, सांगली, बीड जिल्ह्यांतील काही ठिकाणांचा अपवाद वगळता राज्यात फारसा पाऊस झाला नाही.

अरबी समुद्रातील र्नैऋत्य मोसमी पावसाची शाखा पुढील तीन-चार दिवसांत आणखी मजबूत होईल. बंगालच्या उपसागरातील शाखा या आठवड्यात सक्रिय होऊन पुढे वाटचाल करील. २० जूननंतर मोसमी पाऊस पुन्हा जोर धरेल आणि देशाच्या उर्वरित भागात दाखल होईल.- डॉ. अनुपम कश्यपी, निवृत्त शास्त्रज्ञ, हवामान विभाग

चंद्रपुरात उच्चांकी तापमान

●मोसमी पावसाने उघडीप दिल्यामुळे राज्यात कमाल तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. रविवारी चंद्रपुरात ४१.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

●विदर्भात तापमान ३६ ते ४० अंशांच्या दरम्यान राहिले. नागपुरात ३९.९, भंडारा ४०.४ आणि वर्ध्यात ४०.० अंश सेल्सिअस तापमान होते.

●मराठवाड्यात कमाल तापमान सरासरी ३३ ते ३७ अंशांच्या दरम्यान राहिले. औरंगाबादमध्ये ३४.३, नांदेडमध्ये ३६.८ अंश तापमान होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

●मध्य महाराष्ट्रात नगर ३३.०, नाशिक ३३.८, पुणे ३३.८ आणि सोलापुरात पारा ३५.० अंशांवर होता.