पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या वर्तुळाकार रस्त्यासाठी प्रत्यक्ष भूसंपादन सुरू करण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील उर्से गावातील अडीच एकर क्षेत्र असलेला जमिनीचा व्यवहार पूर्ण करण्यात आला असून संबंधित बाधित शेतकऱ्याची मोबदल्याची रक्कम थेट बँक खात्यावर धनादेशाद्वारे वर्ग करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने भरगोस निधी दिल्याने भूसंपादनाला वेग देण्याचे रस्ते महामंडळाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा <<< स्मार्ट सिटी पाण्यात गेल्यानंतर अधिकाऱ्यांचे पाहणी दौरे

हेही वाचा <<< पावसामुळे शहरभर वाहतूक कोंडी; प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणाही बंद

रस्ते महामंडळाने हाती घेतलेल्या वर्तुळाकार रस्त्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. पूर्व भागात मावळातील ११ गावे, खेडमधील १२ गावे, हवेलीतील १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळातील सहा गावांचा समावेश आहे. यातील ३६ गावांतील जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार निधी उपलब्ध झाल्याने वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. या प्रकल्पासाठी स्वखुशीने जागा देणाऱ्यांना पाचपट मोबदला देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्यानुसार उर्से येथील शेतकऱ्याने स्वखुशीने जागा दिल्यामुळे मावळ तालुक्यातील उर्से गावची निवाडा प्रक्रिया पार पडल्यानंतर अडीच एकर क्षेत्र असणाऱ्या संबंधित शेतकऱ्याला पाच कोटी ६५ लाख ९२ हजार ८०२ रुपयांना मोबदला थेट बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे.

हेही वाचा <<< सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमुळेच शहर पाण्यात

दरम्यान, राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रकल्पासाठी दीड हजार कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. त्यानुसार नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात २५० कोटी रुपये वर्ग केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात दिली. त्यानुसार हा निधी रस्ते महामंडळाकडे प्राप्त झाला आहे. निवाडा प्रक्रिया झाल्यानंतर रस्ते महामंडळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादनासाठी नेमण्यात आलेले गावनिहाय भूसंपादन अधिकारी यांचे बँकेत संयुक्त खाते उघडण्यात आले आहे. बाधितांची गावातील शेतकऱ्यांचा अहवाल क्षेत्रानुसार माहिती आणि इतर कागदपत्रांची रस्ते महामंडळाच्या लेखा कोषागार विभागाकडून तपासणी केल्यानंतर निधी वर्ग करण्यात येणार असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा <<< महापालिकेच्या १५७ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा

राज्य सरकारकडून प्रस्तावित वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनासाठी २५० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार मावळ तालुक्यातील उर्से गावचा निवाडा प्रक्रिया पार पडली असून कागदपत्रांची तपासणी प्रक्रिया देखील पार पडली आहे. त्यानुसार या गावातील बाधिताला मोबदल्याच्या रकमेचा धनादेश देण्यात आला असून प्रत्यक्षात भूसंपादनाला सुरुवात झाली आहे. पुढील भूसंपादन प्रक्रियेला वेग येणार असल्याने निधीबाबत कमतरता पडू नये म्हणून लवकरच राज्य सरकारकडे निधीबाबत प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी