पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी पोलिसांकडून सत्र न्यायालयात अपील करण्यात येणार आहे. गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केलेल्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने गाडेची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी गुन्हे शाखेने यापूर्वी दोनदा न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने पोलिसांचा विनंती अर्ज फेटाळून लावला होता. गाडेची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी गुन्हे शाखेने पुन्हा न्यायालयात अपील केले आहे. गुन्हे शाखेच्या अर्जावर मंगळवारी (८ एप्रिल) सुनावणी होणार आहे.
बलात्कार प्रकरणात गाडेला २८ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालायने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले हाेते. गाडेला १४ दिवसांऐवजी १२ दिवसांची कोठडी मिळाली होती. उर्वरित दोन दिवसांच्या पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात यावी, असा अर्ज पोलिसांनी यापूर्वी न्यायालयात सादर केला होता.
गाडेला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालायच्या आवारात त्याला भेटण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज त्याचे वकील वाजेद खान-बिडकर यांनी न्यायालयात सादर केला होता, तसेच कारागृहात त्यांची मुलाखत घेण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज त्यांनी दिला होता. न्यायालयाने ॲड. वाजेद खान-बिडकर यांचा अर्ज मंजूर केला.