पिंपरी : भाजपला मानणारे शहर अशी ओळख असलेल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी नगराध्यक्षपदासाठी भाजपचे संतोष दाभाडे यांची उमेदवारी जाहीर करून खेळी केली.
आमदाराने जाहीर केलेल्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की दुसरा उमेदवार द्यायचा, महायुती करायची की नाही याबाबत भाजपमध्ये संभ्रमावस्था आहे. महायुती झाली नाही, तर आमदारांसोबत असलेले काही भाजपचे पदाधिकारी ‘घड्याळावर’ लढण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस महायुती, की समितीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
नगर परिषदेच्या २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे १४, शहर सुधारणा समितीचे सहा आणि जनसेवा विकास समितीचे सहा असे बलाबल होते. नगराध्यक्षा म्हणून भाजपच्या चित्रा जगनाडे जनतेतून निवडून आल्या होत्या. नऊ वर्षांत मोठी राजकीय उलथापालथ झाली. भाजपमध्ये असलेले सुनील शेळके दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार झाले. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे बापू भेगडे यांनी बंडखोरी केली होती. त्यांना भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्यासह महाविकास आघाडीने पाठिंबा देत ‘मावळ पॅटर्न’ उदयास आणला. आता त्यात फूट पडली असून, बापू यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण, त्यांची भूमिका अद्याप गुलदस्तात आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी अपक्ष उमेदवार भेगडे यांचा प्रचार करत असताना, भाजपचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी महायुतीकडून लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शेळके यांचा प्रचार केला. याचीच परतफेड म्हणून आमदार शेळके यांनी संतोष दाभाडे यांची नगराध्यक्षपदासाठी परस्पर उमेदवारी जाहीर केली. ‘राष्ट्रवादी’च्या आमदाराने भाजपच्या नेत्याची उमेदवारी जाहीर केल्याने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.
पक्षाचा पदाधिकारी असल्याने विरोधही करता येईना आणि आमदारांच्या भूमिकेला समर्थन कसे द्यायचे, यावरून भाजपमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. त्यातून दाभाडे हे भाजपचे जुने कार्यकर्ते असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांच्या नावाला आमचा विरोध नाही. पण, बैठक घेऊन यावर मार्ग काढावा, अशी भूमिका आता भाजपने घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून युतीचे प्रयत्न सुरू आहेत. कारण, विधानसभा निवडणुकीत साथ दिलेले भाजपचे इच्छुक उमेदवार ‘घड्याळ’ चिन्हावर लढण्यास तयार नाहीत. त्यामुळे ‘घड्याळा’वर सर्व निवडणुका लढविण्याचा नारा दिल्यानंतर आता बेरजेच्या राजकारणासाठी समितीच्या माध्यमातून निवडणूक लढवायची, की ‘घड्याळा’वरच लढायचे याची चाचपणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून केली जात असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस समितीच्या माध्यमातून निवडणूक लढल्यास भाजपचे ‘कमळ’ चिन्हावरील उमेदवार असतील. त्यामुळे भाजपमध्ये पण आमदार शेळके यांच्यासोबत असलेल्यांची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच युतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून हालचाली केल्या जात असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक
सलग २५ वर्षे मावळचा आमदार भाजपचा होता. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार झाला. मावळात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) प्रमुख पक्ष झाला. त्या खालोखाल भाजपची ताकद आहे. शेळके राष्ट्रवादीचे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच नगर परिषदेची निवडणूक होत आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी शेळके यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तर, मागील सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांचा कस लागणार आहे.
जनसेवा विकास समितीचे काय?
मागील निवडणुकीत जनसेवा विकास समितीचे सहा नगरसेवक निवडून आले होते. आताचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे हेही या समितीकडून निवडून आले होते. समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या निधनानंतर समितीचे अस्तित्व दिसून येत नाही.
महाविकास आघाडीत शांतता
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे जाहीर केले. पण, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार, कोणता पक्ष किती जागा लढविणार याबाबत कोणतीही भूमिका मांडली नाही.
१४ प्रभाग २८ नगरसेवक
तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीत १४ प्रभाग असून, २८ नगरसेवक असणार आहेत. एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. ६४ हजार ६७८ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार ३३ हजार ३०१, महिला मतदार ३१ हजार ३७५ आणि इतर मतदार दोन आहेत.
