पुणे : मांजरी येथील उपबाजार समितीच्या जवळ असलेली अँमिनिटी स्पेसची जागा बाजार समितीला पार्किंग करण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे या बाजार समितीच्या भागातील पार्किंगची समस्या मार्गी लागणार असून पर्यायाने पुणे-सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. १० वर्षाच्या भाडेकरारावर ही जागा महापालिकेकडून दिली जाणार आहे.
पुणे बाजार समितीच्या मांजरी उपबाजार समितीमध्ये दररोज येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. या भागात पुरेसे पार्किग नसल्याने अनेकदा रस्त्याच्या कडेला तर कधी रस्त्यावरच गाड्या लावल्या जातात. यामुळे या भागात वाहतूक कोंडी निर्माण होते. या बाजार समितीच्या शेजारी महापालिकेची दीड एकर अँमिनिटी स्पेस आहे. ही जागा पार्किगसाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. १० वर्षांच्या कराराने ही जागा दिली जाणार असून यासाठी प्रति वर्षे ९ लाख ८१ हजार ५३ रुपये भाडे आणि प्रत्येक तीन वर्षांनी त्यामध्ये पाच टक्के वाढ केली जाणार आहे. हा प्रस्ताव महपालिका प्रशासनाने तयार करुन तो मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवला आहे.
शेतकरी ते ग्राहक या धर्तीवर मांजरी येथे आण्णासाहेब मगर उपबाजार आहे. पुणे सोलापुर महामार्गालगत हा बाजार असल्याने या उपबाजारामध्ये हवेली पूर्व, दौंड, शिरूर, बारामती, पुरंदर तालुक्यातून शेती मालाची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते. शेतीमाल घेऊन येणारी तसेच शेतीमाल खरेदी करण्यासाठी सुमारे दीड हजार वाहने येथे दैनंदिन येतात. यासह बाजार समितीच्या आवारात इतर कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांमुळे येथे पार्किंग करण्यासाठी उपलब्ध असलेली जागा कमी पडते. पर्यायाने वाहनचालक पुणे सोलापुर महामार्गावर आपली वाहने लावत. त्यामुळे पुणे सोलापुर महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत होती.
मांजरी उपबाजाराचा वाढत असलेला विस्तार आणि अपुऱ्या जागेमुळे येथे वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या सदस्यांनी मांजरी येथील उपबाजारालगत पुणे महापालिकेकडे असलेली अँमिनिटी स्पेसची जागा तीस वर्षे लिज कराराने देण्याची मागणी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे ऑक्टोबर २०२३ मध्ये केली होती. यावर पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिकेला ही जागा देण्याची सूचना केली होती. त्यावर आता बाजार समितीने प्रस्ताव दाखल केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीकडे देण्यात आलेल्या प्रस्तावानुसार मांजरी बुद्रुक ता. हवेली, जि. पुणे येथील सर्वे नं ७५/१/२अ/१ मधील १६.६५ आर क्षेत्र व सर्वे नं ७५/२ मधील ४५.७५ आर क्षेत्रफळाची जागा पुणे बाजार समितीला केवळ शेतकरी शेतमाल व खरेदीदारांचे वाहनतळ या वापर करण्याच्या अटीवर देण्याचे नमूद केले आहे. दोन्ही सुविधा भूखंड १० वर्षे कालावधीसाठी ९ लाख ८१ हजार ५३ रुपये वार्षिक भाडे असणार आहे. तर दर ३ वर्षांनी ५ टक्के भाडेवाढ केली जाणार आहे. या जागेमुळे बाजार समितीची पार्किंगचा प्रश्न सुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.