लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेमध्ये निवड यादीत प्रवेश जाहीर झालेल्या मुलांच्या प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पालकांना १५ मेपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. दरम्यान, आतापर्यंत जवळपास ४९ हजार ३०० पालकांनी प्रवेश निश्चित केले आहेत.

प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राज्यात आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आठ हजार ८२३ शाळांमध्ये एक लाख एक हजार ८४६ प्रवेशांच्या जागा उपलब्ध झाल्या. या जागांसाठी तीन लाख ६४ हजार ४१३ बालकांच्या पालकांनी अर्ज केले. प्रवेशासाठीच्या सोडतीनंतर ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांची निवडयादी जाहीर करण्यात आली. १३ एप्रिलपासून प्रवेश निश्चिती सुरू झाल्यापासून या प्रक्रियेत पालकांचा थंड प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा… पुणे: महिलेची फसवणूक करणारा तोतया पत्रकार अटकेत

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन सोडतीद्वारे निवड झालेल्या मुलांच्या कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्यासाठी १५ मेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. प्रवेशाबाबतच्या तक्रारी आणि अपील अर्जांबाबत सुनावणी घेऊन प्रकरणे १५ मेपर्यंत निकाली काढावीत. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील मुलांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The deadline for rte admissions has now been extended till 15th may in pune print news dvr
First published on: 08-05-2023 at 19:15 IST