पुणे : प्रशांत महासागरात अद्याप सक्रिय असलेली ‘एल-निनो’ची स्थिती हळूहळू कमी होऊन मोसमी पावसाच्या सुरुवातीस जूनमध्ये ‘ला-निना’ची स्थिती तयार होईल. परिणामी भारतासह दक्षिण आशियात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आशिया-पॅसिपिक आर्थिक सहकार्य संघटनेच्या (अपेक) हवामान केंद्राने व्यक्त केला आहे.

आशिया – पॅसिपिक आर्थिक सहकार्य संघटनेच्या हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, जून २०२३ मध्ये प्रशांत महासागरात सक्रिय असलेली एल-निनोची स्थिती आजअखेर सक्रिय आहे. एल-निनोमुळे मागील वर्षाच्या मोसमी पावसावर परिणाम झाला होता. सध्या एल-निनोची स्थिती सक्रिय आहे. पण, यंदाचा मोसमी पावसाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी जूनमध्ये एल-निनोची स्थिती हळूहळू कमी होऊन मोसमी पावसाला पोषक ला-निनाची स्थिती निर्माण होईल. त्यामुळे भारतासह दक्षिण आशियात पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने जुलै ते सप्टेंबर, या तीन महिन्यांत भारतात चांगल्या सरी पडण्याचा अंदाजही अपेकने वर्तविला आहे. ला-निनाच्या स्थितीमुळे भारतात सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो, असे आजवरचे निरीक्षण आहे.

हेही वाचा >>>तर भाजपसोबत माझी ‘ए’ टीम : रामदास आठवले

या भागात पावसाचा अंदाज

ला-निनाच्या स्थितीमुळे पूर्व आफ्रिकेपासून अरबी समुद्रापर्यंतच्या देश, भारतासह दक्षिण आशियातील देश. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या शेजारील देश. इंडोनेशिया, कॅरिबियन समुद्राचा परिसर, उष्णकटिबंधीय उत्तर अटलांटिक, दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण पॅसिफिक महासागरातील देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस प्रामुख्याने जुलै ते सप्टेंबर, या काळात पडण्याची शक्यताही अपेकने वर्तविली आहे.