पुणे : हुंड्यासाठी झालेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणे यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) वतीने आक्रमक भूमिका घेऊन बालगंधर्व नाट्यगृहाजवळील झाशीची राणी चौकात आंदोलन करण्यात आले. वैष्णवीचे सासरे राजेंद्र यांना अटक करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात रवींद्र माळवदकर, स्वाती पोकळे, भारती शेवाळे, श्रीकांत पाटील, श्रद्धा जाधव, राजश्री पाटील, ऋतुजा देशमुख, केतन ओरसे, विक्रम जाधव, पूजा काटकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

‘वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘नराधम राजेंद्र हगवणेला अटक करा’, ‘गृहमंत्री जागे व्हा’, ‘नराधमांना फाशीची शिक्षा द्या,’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. ‘एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना आजही हुंड्यासाठी निष्पाप मुलींचा बळी घेतला जातो. अशा घटनेमुळे समाजातील इतर कुटुंबांवरदेखील गंभीर परिणाम झाला आहे.

माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेत वैष्णवीला पूर्ण न्याय मिळावा, यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत. हगवणे कुटुंबातील सर्व सदस्यांवर खून, अपहरण, संघटित गुन्हेगारी, ठरवून कट करणे या आरोपांखाली ‘मकोका’अंतर्गत कारवाई करण्यात यावी. तसेच, या सर्व प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई झाल्याने गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवीच्या कुटुंबीयांची माफी मागावी,’ अशी मागणी शहराध्यक्ष जगताप यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.