पुणे : पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी राज्य सरकारने पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव नवल किशोर राम यांची नियुक्ती केली आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले ३१ मे रोजी निवृत्त होत आहेत.

राम हे भारतीय प्रशासकीय सेवेतील २००८ या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. मूळचे बिहारचे असलेल्या राम यांची पहिली नियुक्ती नांदेड येथे झाली होती. त्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड आणि संभाजीनगरचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले. संभाजीनगरमधील कचऱ्याच्या प्रश्नानिमित्त ते प्रकाशझोतात आले. पुणे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. करोना काळात ते पुण्याचे जिल्हाधिकारी होते.

त्यांच्या कामाची दखल घेऊन दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून ते नुकतेच राज्य सरकारकडे रुजू झाले आहेत. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पुणे महापालिका आयुक्त म्हणून नवल किशोर राम यांची नियुक्ती केल्याचा आदेश काढला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. भोसले यांच्याकडून ३१ मे रोजी राम यांनी पदभार स्वीकारावा, असे राज्य सरकारने काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.