महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत (एमएसबीटीई) तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रचलित पद्धतीने घेण्यात आलेल्या २०२२च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेचा निकाल योग्य आहे. करोना काळात घेतलेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल आणि प्रचलित पद्धती झालेल्या परीक्षेचा निकाल यांची तुलना करणे योग्य नाही. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाणार नसल्याचे तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

उन्हाळी परीक्षा २०२२चा निकाल कमी लागल्याच्या पार्श्वभूमीवर एमएसबीटीईकडून परिपत्रकाद्वारे स्पष्टीकरण देण्यात आले. हिवाळी परीक्षा २०१९ नंतर पहिल्यांदाच उन्हाळी परीक्षा २०२२ प्रचलित पद्धतीने झाली. तर करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाच्या निर्देशांनुसार २०२० आणि २०२१ मध्ये उन्हाळी आणि हिवाळी या दोन्ही सत्रांच्या परीक्षा विद्वत परिषदेच्या मान्यतेने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (एमसीक्यू) ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑनलाइन पद्धतीच्या परीक्षांचे स्वरुप प्रचलित पद्धतीच्या परीक्षांपेक्षा भिन्न होते. ऑनलाइन परीक्षेतील उत्तीर्णतेची टक्केवारी जास्त होती. ही पार्श्वभूमी विचारात घेता उन्हाळी २०२२ परीक्षेच्या निकालाची तुलना २०२० आणि २०२१मधील ऑनलाइन पद्धतीने झालेल्या परीक्षेच्या निकालाशी करणे योग्य नाही. २०१८च्या उन्हाळी परीक्षेचा निकाल ३६.५५ टक्के, २०१९च्या उन्हाळी परीक्षेचा निकाल ३९.३५ टक्के लागला होता. तर २०२२च्या उन्हाळी परीक्षेचा निकाल ३७.३७ टक्के लागला. त्यामुळे २०२२च्या उन्हाळी परीक्षेचा निकाल कमी लागल्याच्या चर्चेत तथ्य नसून या परीक्षेच्या निकालामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. तसेच अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्यात येणार नसल्याचे डॉ. चितलांगे यांनी स्पष्ट केले.