पुणे : ‘एटीएम’मधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना चोरांनी ‘लक्ष्य’ केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या चोरांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. उत्तर प्रदेशातून येऊन पैसे काढणाऱ्या नागरिकांची फसवणूक करून चोर पसार होत असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.
एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठांकडे बतावणी करून चोर रोकड लांबवितात. मध्यंतरी खडकी बाजारात एका ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करून चोरांनी त्यांच्या खात्यातून एक लाख रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी करून उत्तर प्रदेशातील चोरांना अटक केली होती. चोर विमानाने पुण्यात आले होते. गुन्हे करून ते उत्तर प्रदेशात पसार होण्याच्या तयारीत असताना खडकी पोलिसांनी त्यांना सापळा लावून पकडले होते.
अशाच प्रकारची एक घटना रास्ता पेठेतील एका बँकेच्या एटीएम केंद्रात नुकतीच घडली. एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाकडे बतावणी करून चोरांनी खात्यातून एक हजार रुपयाची रोकड चोरून नेली होती. समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरू करण्यात आला. पोलिसांच्या पथकाने रास्ता पेठेतील एका एटीएमजवळ सापळा लावून संतोषकुमार किशोरीलाल सरोज (वय २८), प्रदीपकुमार नंदकिशोर मौर्या (वय २६, दोघे रा. जि. प्रतापगढ, उत्तर प्रदेश) यांना पकडले. चौकशीत दोघे जण उत्तर प्रदेशातून पुण्यात गुन्हे करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. दोघांनी अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय आहे. यापूर्वी दोघांना वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली होती, अशी माहिती पोलीस निरीक्षक गित्ते यांनी दिली.
फसवणूक करण्याची पद्धत
ज्या भागात फारशी वर्दळ नसते. अशा बँकांच्या एटीएमजवळ चोरांचा वावर असतो. ‘एटीएम’मध्ये चोर तांत्रिक छेडछाड करतात.
‘एटीएम’मधील ज्या भागातून पैसे (कॅश डिस्पेन्सर) बाहेर पडतात. तेथे चोर लाेखंडी पट्टी लावतात. ज्येष्ठ नागरिक पैसे काढण्यासाठी ‘एटीएम’मध्ये गेल्यानंतर डेबिट कार्डचा वापर करून पैसे काढतात.
व्यवहार पूर्ण झाल्याचा संदेश मोबाइलवर येतो. मात्र, लोखंडी पट्टीमुळे पैसे बाहेर येत नाहीत. त्यानंतर त्यांच्या मागोमाग चाेर एटीएममध्ये शिरतात. तांत्रिक बिघाड झाल्याची बतावणी करतात. पैसे न घेता ज्येष्ठ नागरिक बाहेर पडल्यानंतर चोरटे लोखंडी पट्टी सरकावून पैसे काढतात.
बहाणा करून ‘पासवर्ड’ची चोरी
काही प्रकरणांत चोर मदतीचा बहाणा करून ज्येष्ठांकडील डेबिट कार्ड आणि सांकेतिक शब्द (पासवर्ड) घेतात.
चोर त्यांच्याकडील डेबिट कार्ड ज्येष्ठाला देतात. त्यानंतर चोरलेल्या डेबिट कार्ड आणि सांकेतिक शब्दाचा वापर करून चोर पैसे काढून पसार होतात.
‘एटीएम’मधून पैसे काढताना ज्येष्ठांनी सजग राहावे.
शक्यतो अनोळखी व्यक्तीच्या बतावणीकडे काणाडोळा करावा.
‘एटीएम’च्या बाहेर फिरणाऱ्या संशयितांची माहिती त्वरित पोलिसांना कळवावी.
‘एटीएम’मध्ये प्रवेश केल्यानंतर सुरक्षेची खातरजमा करावी.
‘एटीएम’मधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक प्रकरणात पोलिसांनी उत्तर प्रदेशातील दोन चोरांना नुकतीच अटक केली. चोर गुन्हे करण्यासाठी शहरात येत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. पदपथावरील दुकानांच्या आडोशाला ते झोपतात. ‘एटीएम’च्या परिसरात चोरांचा वावर असतो. ‘एटीएम’च्या परिसरात संशयित आढळल्यास पोलिसांना त्वरित माहिती द्यावी.
उमेश गित्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस ठाणे</p>