पुणे : अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले. त्यानुसार ६ ते ९ जुलै या कालावधीत नवीन विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग एक भरून तो प्रमाणित करणे, नोंदणीकृत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांची पसंतीक्रम नोंदवता येणार असून, प्रवेशाची गुणवत्ता यादी १२ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेअंतर्गत एकूण ७६ हजार ४९९ जागा बाकी आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा ३२६ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण १ लाख १४ हजार ३५० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यात केंद्रिभूत प्रवेशांसाठी ८९ हजार ८७० जागा, तर कोटाअंतर्गत प्रवेशांसाठी २४ हजार ४८० जागांचा समावेश आहे.

हेही वाचा – सेवा विकास बँके गैरव्यवहार प्रकरणात माजी संचालक अमर मुलचंदानी यांना ईडीकडून अटक

प्रवेशाच्या पहिल्या फेरीत ४२ हजार २३९ विद्यार्थ्यांना, तर दुसऱ्या फेरीत २० हजार ६०७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. दुसऱ्या फेरीअंतर्गत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी बुधवार सायंकाळपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार बुधवार सायंकाळपर्यंत ३७ हजार ८५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. त्यात केंद्रीभूत प्रवेशांद्वारे ३२ हजार ५११ आणि कोट्याअंतर्गत ५ हजार ३४० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे अद्यापही एकूण ७६ हजार ४९९ जागा बाकी असल्याचे अकरावी प्रवेश संकेतस्थळावरील आकडेवारीतून दिसून येत आहे.

हेही वाचा – यूजीसीने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय; सहायक प्राध्यापक नियुक्तीसाठी पीएच.डी.ची अट संपुष्टात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ६ ते ९ जुलै या कालावधीत नवीन विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग एक भरून तो प्रमाणित करणे, नोंदणीकृत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांची पसंतीक्रम नोंदवता येईल. १२ जुलैला गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना १२ ते १४ जुलै या कालावधीत प्रवेश निश्चित करता येईल. तसेच घेतलेला प्रवेश रद्द करता येईल. पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय जाहीर होऊनही प्रवेश न घेतल्याने दुसऱ्या फेरीत प्रतिबंधित केलेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत सहभागी होता येईल. याच कालावधीत कोटाअंतर्गत प्रवेश आणि द्विलक्ष्यी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.