पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर पुणे पोलिसांकडून त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. शरद पवार यांना टि्वटरवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्य शासनाने त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.
पवार यांचे शहरात आगमन झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत अतिरिक्त पोलीस कर्मचारी ठेवण्यात येणार आहेत. पवार यांचा दौरा, बैठका, भेटीगाठी विचारात घेऊन सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानाच्या परिसरात बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.



