पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवार कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गुरुवारी (१४ मार्च) सभांचा धडाका करणार आहेत. या मतदारसंघात अजित पवार यांच्या एकूण सात सभा होणार आहेत. या सभांच्या माध्यमातून पवार बारामती तालुका पिंजून काढणार असून, सभेच्या माध्यमातून अजित पवार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. बारामती लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी अजित पवार सरसावले असल्याने शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही भेटीगाठी आणि मेळाव्यांचा धडाका सुरू केला आहे. त्यानंतर आता अजित पवारही मैदानात उतरले आहेत. बारामती तालुक्यामध्ये गुरुवारी अजित पवार सात सभा घेणार आहेत. तालुक्यातील सर्व गावांतील कार्यकर्त्यांना सात सभांना वेगवेगळ्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले आहे.

हेही वाचा…सुनील देवधर यांना पुण्यातील उमेदवारीत का डावलले ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुपे, कोऱ्हाळे बुद्रुक, झारगडवाडी, करंजेपूल, माळेगाव बुद्रुक, नीरा वागज आणि बारामती शहरातील मुक्ताई लॉन्स येथे अजित पवार सभा घेणार असून, त्यांची भूमिका कार्यकर्त्यांपुढे मांडणार आहेत. या सभेच्या माध्यमातून अजित पवार यांच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. सभेवेळी अजित पवार कोणावर टीका करणार, याबाबत बारामती तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.