नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील प्रमुख मंदिरांच्या परिसरात सोमवारपासून (२६ सप्टेंबर) वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. नवरात्रोत्सवात भाविकांची श्री चतु:शृंगी मंदिर, श्री भवानी माता मंदिर, श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरात मोठी गर्दी होते. प्रमुख मंदिरांच्या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>पुणे : बैल गेला आणि झोपा केला अशी परिस्थिती आदित्य ठाकरे यांची झाली : आमदार गोपीचंद पडळकर

श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (हुतात्मा चौक) दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक अशी एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. गर्दी वाढल्यास या भागातील वाहतूक व्यवस्थेत आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते तांबडी जोगेश्वरी मंदिर दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. फुटका बुरूज चौकातून श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून अन्य वाहनांनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी कळविले आहे.

हेही वाचा >>> लोणावळा : महाराष्ट्रातील उद्योजकांना ‘खोके मागतील’ ही भीती ,आदित्य ठाकरे यांचा शिंदे सरकारवर आरोप; तळेगावात ‘जनआक्रोश’

श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, शनिवार पेठेतील श्री अष्टभुजा मंदिर, नारायण पेठेतील श्री अष्टभुजा मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. मध्यभागातील मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी नदीपात्रातील रस्ता, मंडईतील वाहनतळावर वाहने लावावीत.भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. रामोशी गेट चौक ते जुना मोटार स्टँड दरम्यान रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी नेहरु रस्ता आणि परिसरात वाहने लावावीत. श्री भवानी माता मंदिर परिसरातून जाणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.

हेही वाचा >>> हृदयविकारावरील औषधाच्या नव्या स्फटिकरूपी संयुगाचा शोध; हैदराबाद विद्यापीठाचे संयुक्त संशोधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेनापती बापट रस्त्यावरील श्री चतु:शृंगी मंदिर परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. सेनापती बापट रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यास पत्रकारनगर चौकातून सेनापती बापट रस्त्याकडे येणारी वाहतूक शिवाजी हाऊसिंग सोसायटी चौकातून सेनापती बापट रस्त्याच्या डाव्या बाजूने एकेरी करण्यात येईल. गर्दी वाढल्यास सेनापती बापट रस्त्यावरुन श्री चतु:शृंगी मंदिराकडे येणारी वाहतूक वेताळबाबा चौकातून दीपबंगला चौकातून, ओम सुपर मार्केटमार्गे गणेशखिंड रस्त्याकडे वळविण्यात येईल.