लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त बुधवारी (१४ जून) शहराच्या पूर्व भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथून बुधवारी पहाटे मार्गस्थ होणार आहे. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिर येथून मार्गस्थ होणार आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठ, रामोशी गेट, भवानी माता मंदिर, लष्कर भागातील मुक्ती फौज चौक, पूलगेट पोलीस चौकी, मम्मादेवी चौक, सोलापूर रस्ता, हडपसर गाडीतळ येथून सासवड रस्त्याने पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. श्री तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील अरुणा चौक, समाधान चौक, पिंपरी चौक, एडी कॅम्प चौक, रामोशी गेट, भवानी माता मंदिर, मुक्ती फौज चौक, पूलगेट पोलीस चौकी, मम्मादेवी चौक, सोलापूर रस्ता, हडपसर गाडीतळ येथून सरळ सोलापूर रस्त्याने लोणी काळभोरमार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होईल.

आणखी वाचा-मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर केमिकलच्या टँकरला आग; चार जणांचा मृत्यू, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

बुधवारी पहाटे दोन वाजल्यापासून पालखी पुणे शहराबाहेर पोहोचेपर्यंत पालखी मार्ग टप्याटप्याने बंद करण्यात येईल. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते पुढीलप्रमाणे- संत कबीर चौक- बेलबाग चौक (लक्ष्मी रस्ता), संत कबीर चौक ते रामोशी गेट (नेहरु रस्ता), सेव्हन लव्ह चौक (ढोले पाटील चौक) ते रामोशी गेट, गोळीबार मैदान ते सेव्हन लव्ह चौक, मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान, बिशप स्कूल चौक ते मम्मादेवी चौक, वानवडी बाजार ते मम्मादेवी चौक, ट्रायलक चौक, महात्मा गांधी रस्ता, रामोशी गेट चौक, भैरोबानाला ते मम्मादेवी चौक, जांभुळकर चौक ते फातिमानगर चौक, बी. टी. कवडे रस्ता, रामटेकडी चौक, वैदुवाडी चौक, मगरपट्टा चौक, हडपसर गाव वेस, सिरम कंपनी चौक ते सोलापूर रस्ता, मंतरवाडी फाटा ते सासवड रस्ता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे-सोलापूर रस्त्याने येणाऱ्या जड वाहनचालाकंनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत जाणाऱ्या दिंड्यामधील वाहनांनी भैरोबानाला चौक, लुल्लानगर चौक, कोंढवा खडीमशीन चौक, बोपदेव घाटमार्गे सासवडकडे जावे किंवा मंतरवाडी फाटा, फुरसुंगी, उंड्री, पिसोळी, खडी मशीन चौकमार्गे बोपदेव घाटातून सासवडकडे जावे. वाहतूक बदलांविषयी माहिती हवी असल्यास वाहतूक शाखा मुख्य नियंत्रण कक्ष (दूरध्वनी क्रमांक- ०२०-२६६८५००० किंवा ०२०-२६६८४०००) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.