लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: मुंबई – बंगळुरू महामार्गावरील नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी स्वतंत्र वाहतूक पोलीस चौकी शुक्रवारी सुरू करण्यात आली आहे. मात्र, या चौकीच्या उद्घाटनाच्या मुहूर्तापूर्वीच शुक्रवारी सकाळी दोन अपघात झाल्याने पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली.

नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल परिसरात होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांकडून बाह्यवळण मार्गावर बोगद्याजवळ वाहतूक पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या चौकीचे उदघाटन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास करण्यात आले. अपघात घडल्यास जखमींना वेळेवर मदत उपलब्ध करुन देण्यासाठी वाहतूक विभागाकडून चौकी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा… पुणे: ‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने व्यावसायिकाला ९६ लाखांचा गंडा

मात्र, या चौकीचे उद्घाटन होण्यापूर्वी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत दोन अपघात झाले. सकाळी नऊच्या सुमारास नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटजवळ अवजड कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोटारीला धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, मोटारीचे नुकसान झाले. त्यानंतर याच भागात सकाळी साडेअकराच्या सुमारास एक अपघात झाला.

हेही वाचा… पुणे: वनाज सहकारी गृह रचना संस्थेच्या माजी अध्यक्षांसह पाच जणांवर गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातांनंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. क्रेनच्या सहायाने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यात आली.