पुणे : बांधकामांसाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यास प्रतिसाद मिळत असून गेल्या अडीच महिन्यात शहरातील विविध प्रकारच्या बांधकामांसाठी ९०० टँकर्सच्या माध्यमातून प्रक्रिया केलेले १ कोटी लिटर पाणी महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. शहरात प्रतिदिन निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया व्हावी आणि त्या पाण्याचा पुनर्वापर व्हावा, यासाठी सांडपाणी शुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी बांधकामांसाठी वापरणे महापालिकेने बंधनकारक केले आहे. तसे आदेश महापालिका आयुक्तांनी काही महिन्यांपूर्वी काढले होते. त्यानुसार महापालिकेच्या विविध विभागांकडून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर सुरू करण्यात आला आहे.

सर्व प्रकारची बांधकामे, बॅच मिक्स प्लॅन्ट येथे प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने १० ठिकाणी प्रकल्प उभारले आहेत. त्या माध्यमातून प्रतिदिन ४०० ते ४५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी शुद्ध करून नदीपात्रात सोडले जाते. विकासकामे आणि बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरले जात असल्याने पिण्याच्या पाण्याचा वापर टाळणे यामुळे शक्य झाल्याचा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे. सध्या महापालिकेकडून दहा हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या अडीच महिन्यात ९०० ते एक हजार टँकरद्वारे १ कोटी लिटर पाणीपुरवठा विविध कामांसाठी करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचा समावेश असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रभागातील सिमेंटच्या रस्त्यांचे विकसन करताना तसेच महापालिकेच्या उद्यानात यापूर्वी पिण्याच्या पाण्याचा वापर सातत्याने करण्यात येत होता. त्यातून पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत असल्याचे स्पष्ट झाले होते. जलकेंद्रातून टँकर भरून पिण्याचे पाणी या कामांसाठी वापरले जात होते. त्यामुळे या प्रकारच्या सर्व कामांना प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक करण्यात आले होते. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळणे यामुळे शक्य होत असल्याचा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे. प्रक्रिया केलेले पाणी वापरण्यात येत असल्याने सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांनाही प्रक्रिया करणे भाग पडत आहे.