पुणे : नीलेश चव्हाण शशांक हगवणे आणि वैष्णवी कस्पटे यांचा विवाह ठरविताना झालेल्या बैठकीत सहभागी होता; तसेच वैष्णवी आणि शशांकमधील वाद मिटविण्यात तो सहभागी झाला होता. वैष्णवी यांचे सासरे राजेंद्र, दीर सुशील, सासू लता, नणंद करिष्मा यांचे मोबाइल संच चव्हाणने लपविले आहेत. हगवणे पिता-पुत्र आणि चव्हाण यांची समाेरासमोर चौकशी करायची आहे, अशी माहिती बावधन पोलिसांनी शनिवारी न्यायालयात दिली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी नीलेश चव्हाणसह हगवणे पिता-पुत्राच्या पोलीस कोठडीत तीन जूनपर्यंत वाढ करण्याचा आदेश दिला.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार झालेल्या नीलेश चव्हाणला (वय ४५, रा. औदुंबर सोसायटी, कर्वेनगर) बावधन पोलिसांनी नेपाळ सीमेवरून ताब्यात घेतले. चव्हाणला शनिवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. वैष्णवी यांचे सासरे राजेंद्र हगवणे (वय ५४), दीर सुशील (वय २७, दोघे रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम, ता. मुळशी) यांच्या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपली. हगवणे पिता-पुत्राला पाेलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चव्हाणसह हगवणे पिता-पुत्राच्या पोलीस कोठडीत तीन जूनपर्यंत वाढ करण्याचा आदेश दिला.

‘नीलेश चव्हाणकडून कट’

‘नीलेश चव्हाणकडे शस्त्र परवाना आहे. त्याने वैष्णवी यांना पिस्तुलाचा धाक दाखविल्याची शक्यता आहे. चव्हाण हा करिष्माचा मित्र आहे. त्याने हगवणे कुटुंबीयांबरोबर कट रचला, तसेच वैष्णवीचा छळ करण्यासाठी चिथावणी दिली. शशांक, सुशील, राजेंद्र हगवणे यांच्याशी चव्हाण याचे आर्थिक हितसंबंध आहेत का, या दृष्टीने तपास करायचा आहे,’ असे बावधन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते, सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात सांगितले.

चव्हाणला मदत कोणी केली?

‘वैष्णवीची सासू लता, नणंद करिष्मा यांचे मोबाइल संच नीलेश चव्हाणकडे देण्यात आले होते. तो नेपाळमार्गे पसार होण्याचा तयारीत होता. त्याला पसार होण्यासाठी कोणी मदत केली, तसेच तो नेपाळ सीमेपर्यंत कसा पोहोचला, याबाबत तपास करायचा आहे. हगवणे आणि चव्हाण यांच्यात समाजमाध्यमात झालेल्या संवादाची तांत्रिक तपासणी करायची आहे. हगवणे कुटुंबीयांनी हुंड्यापोटी घेतलेल्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तपासासाठी हगवणे पिता-पुत्र, तसेच चव्हाणला पोलीस कोठडी देण्यात यावी. त्यांची समाेरासमोर चौकशी करायची आहे,’ असे सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी युक्तिवादात नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘चव्हाणची अटक बेकायदा’

‘नीलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबीयांचा जवळचा नातेवाईक आहे. त्याला या गुन्ह्यात अटक करणे बेकायदा आहे. त्याच्याकडे आरोपींचे मोबाइल संच असू शकतात, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही शक्यता चुकीची आहे. चव्हाण हा हगवणे कुटुंबाला मदत करत होता. त्याला या प्रकरणात आरोपी करणे चुकीचे आहे,’ असे चव्हाणचे वकील ॲड. स्वानंद गोविंदवार यांनी युक्तिवादात सांगितले.