पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असला, तरी अद्याप प्रचाराला वेग आलेला नाही. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे या दोघांनीही भेटीगाठी, बैठकांवरच भर दिला आहे. त्यामुळे मावळातील प्रचारात अद्याप रंगत आल्याचे दिसत नाही. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने कोणालाही उमेदवारी जाहीर केली नसताना डॉ. अक्षय माने, सचिन सोनवणे या दोघांनी वंचितच्या नावाने उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. महायुतीचे उमेदवार बारणे हे सोमवारी (२२ एप्रिल), तर महाविकास आघाडीचे उमेदवार वाघेरे हे मंगळवारी (२३ एप्रिल) रोजी उमेदवार अर्ज भरणार आहेत. त्यापूर्वी दोघांचाही भेटीगाठी, बैठकांवरच भर दिसत आहे. महायुतीचे उमेदवार बारणे यांच्यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या सुपर वॉरियर्स, बूथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची काळभोरनगर येथे बैठक झाली. पिंपरी विधानसभा मतदारसंघात १२५ नमो सभा घेण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून मतदारांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या कामांची माहिती पोहोचवण्यात येईल, असे आमदार उमा खापरे यांनी सांगितले.
हेही वाचा : शाळेत न जाता पुण्याच्या सई पाटीलने सोडवले ऑलिम्पियाडचे ‘गणित’
खासदार बारणे म्हणाले, की मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही आमदार महायुतीचे आहेत. हिंदुत्वाला मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. गेल्या १० वर्षांत मतदारसंघात भरीव विकासकामे केली आहेत. या तुलनेत विरोधकांकडे दाखवण्यासाठी काहीही काम नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासाठी कर्जत येथे संवाद मेळावा पार पडला. केंद्र, राज्यातील शासनाला शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्गाची चिंता नाही. शेतकरी वर्गासाठी ठोस असे काम झाले नाही. शेतकऱ्यांना अक्षरश: वाऱ्यावर सोडण्याचे पाप राज्यातील महायुती सरकारने केले आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या बेरोजगारीने गंभीर रूप धारण केले आहे. बेरोजगार युवक रस्त्यांवर उतरून आंदोलन करीत आहे. अनेक घटकांकडून रोष व्यक्त केला जात असल्याची टीका वाघेरे यांनी केली.
हेही वाचा : पुणेकरांचा हवाई प्रवास ठरतोय ‘वाऱ्यावरची वरात’!
‘वंचित’च्या नावाने दोन अर्ज
मावळ मतदारसंघासाठी दोन दिवसांत ३९ जणांनी ७० उमेदवारीअर्ज घेतले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या नावाने डॉ. अक्षय माने आणि सचिन सोनवणे या दोघांनी उमेदवारीअर्ज घेतले आहेत. वंचितने अद्याप कोणालाही उमेदवारी जाहीर केली नाही. गोपाळ तंतरपाळे यांनीही अर्ज घेतला आहे. क्रांतिकारी जयहिंद सेनेकडून यशवंत पवार यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केला.