गुंड शरद मोहोळ याची पुण्यात भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर शहरात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोहोळच्या खुनानंतर शहरातील टोळीयुद्ध रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान, या हत्येप्रकरणी पोलिसांनी शरद मोहोळच्या प्रतिस्पर्धी टोळीतल्या विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे याच्यासह पाच जणांना अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या हत्येप्रकरणी तपास केला जात आहे.

शरद मोहोळ हत्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला गुंड विठ्ठल शेलार याची काही वर्षांपूर्वी भाजपाच्या युवा शाखेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. शेलार याने २०१७ मध्ये पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट आणि पुणे भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर बापट आणि भेगडे यांनी शेलार याची पक्षाच्या युवा अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. शेलार हा मुळचा मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा रहिवासी आहे. त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. २०१४ मध्ये त्याच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याला अटकही झाली होती. २०१७ मध्ये त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर काहीच दिवसांत त्याने भाजपात प्रवेश केला.

भाजपाने विठ्ठल शेलारवर मुळशी, मावळ आणि भोर तालुक्यांची जबाबदारी सोपवली होती. दरम्यान, विठ्ठल शेलारच्या भाजपाप्रवेशानंतर पक्षावर टीका सुरू झाली. त्यानंतर गिरीश बापट म्हणाले होते की, आम्हाला विठ्ठल शेलारच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती नव्हती. आम्ही त्याच्यावर कारवाई करू.

शेलारव्यतिरिक्त शरद मोहोळ याच्या पत्नीनेदेखील अलीकडेच भाजपात प्रवेश केला आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थित शरद मोहोळच्या पत्नीने भाजपाचं कमळ हाती घेतलं होतं.

हे ही वाचा >> पुण्यात पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’; टोळीयुद्ध नेमकं कधी सुरू झालं? शरद मोहोळच्या खुनानंतर पोलिसांसमोर काय आव्हान?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने नवी मुंबईतल्या वाशीजवळच्या डान्सबारमधून विठ्ठल शेलार आणि इतर पाच जणांना रविवारी (१४ जानेवारी) ताब्यात घेतलं. त्यानंतर या पाचही आरोपींना पुणे गुन्हे शाखेच्या ताब्यात दिलं आहे. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी १४ जणांना अटक केली आहे. फ्री प्रेस जर्नलने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.