पुणे : पुणे आणि परिसरातील उद्योगांची उत्पादन पातळी गेल्या महिन्याभरात पाच टक्क्यांनी वाढली आहे. मात्र कार्यरत मनुष्यबळात विशेष वाढ झालेली नाही. त्यामुळे कार्यरत मनुष्यबळ वाढण्यासह उत्पादन पातळी वाढण्यासाठी राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल होण्याची उद्योगांना प्रतीक्षा आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरने (एमसीसीआयए) सर्वेक्षण मालिकेतील १६ व्या मासिक सर्वेक्षणाचे निष्कर्ष रविवारी जाहीर केले. या सर्वेक्षणात पुणे आणि परिसरातील दीडशेहून अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदवला. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने मार्चपासून लागू केलेल्या र्निबधांमुळे पुणे आणि परिसरातील कंपन्यांच्या उत्पादनाला मोठा फटका बसला. त्यानंतर निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर जूनमध्ये उत्पादन पातळी, कार्यरत मनुष्यबळात वाढ होऊ लागली. जूनमध्ये ७३ टक्के  असलेली उत्पादन पातळी जुलैमध्ये ७८ टक्क्यांवर पोहोचली, तर जूनमध्ये ७७ टक्के  कार्यरत मनुष्यबळ जुलैमध्ये के वळ एका टक्क्याने वाढले.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांपैकी ३० टक्के  कंपन्यांनी करोनापूर्व काळातील उत्पादन पातळी गाठल्याची माहिती दिली. तर करोना पूर्व काळातील उत्पादने गाठण्यासाठी ५२ टक्के  कंपन्यांना सहा महिने लागतील असे वाटते. तर १८ टक्के  कंपन्यांनी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागण्याचा अंदाज व्यक्त केला. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांमध्ये १७ टक्के  सूक्ष्म, २२ टक्के  लघु, २८ टक्के  मध्यम आणि ३३ टक्के  मोठय़ा उद्योग क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. तसेच या कंपन्यांपैकी ६६ टक्के  कंपन्या उत्पादन क्षेत्रातील, १४ टक्के  कंपन्या सेवा क्षेत्रातील, उर्वरित कंपन्या उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांतील आहेत.

उद्योगांच्या पुरवठय़ाच्या अडचणी कमी झाल्या आहेत. मात्र मागणी जोपर्यंत पूर्वपदाला येत नाही, तोपर्यंत उत्पादन पातळीमध्ये वाढ होणार नाहीत. तसेच उत्पादन पातळी वाढल्याशिवाय कार्यरत मनुष्यबळही वाढणार नाही. त्यामुळे शासनाने निर्बंध कमी के ल्यास उत्पादनाची मागणी वाढीस लागेल. पर्यायाने उत्पादन पातळी आणि कार्यरत मनुष्यबळ वाढून रोजगार संधीही वाढतील. सध्याचा संसर्ग दर पाहता शासनाने निर्बंध शिथिल करावेत आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यावर द्यावा. त्यासाठी उद्योगांकडून शासनाला आवश्यक ते सहकार्य मिळेल. कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याबाबत सातत्याने उद्योगांनाही सांगितले आहे. उद्योगांकडून कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे प्रमाण वाढत आहे.

– प्रशांत गिरबने, महासंचालक, एमसीसीआयए