लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शिवसेना पक्ष जेवढ्या वर्षांचा आहे, तेवढे माझे वय आहे. त्यामुळे आतापर्यंत माझ्या राजकीय आयुष्यात अनेक गोष्टी घडल्या आहेत. पक्षात काम काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नसतात. काहीवेळा थांबावे लागते, असे सूचक वक्तव्य राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी पुण्यात केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भुजबळ यांनी भिडेवाडा स्मारकाची पाहणी केली आणि याबाबत आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भुजबळ म्हणाले, ‘मला खासदार होण्याची इच्छा होती. त्यानुसार नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती. दिल्लीतून माझे तिकीट अंतीम केले होते. वरिष्ठांकडून मला तसे सांगण्यातही आले होते. त्यानुसार मी कामाला लागलो. एक महिना याबाबत काहीच जाहीर करण्यात आले नाही. नाशिक मतदारसंघातील अर्ज माघारीच्या एक दिवस आधी दुसरे नाव जाहीर झाल्याने अपमान नको म्हणून मी माघार घेतली. त्याचे परिणाम आपल्याला दिसलेच आहेत. अनेकवेळा अशा गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या आहेत, परंतु, ज्या त्या गोष्टी वेळेवर सोडून देत पुढे जावे लागते त्यानुसार माझा प्रवास झाला आहे. मला खासदारकीची संधी दिली नाही, म्हणून त्याचा अर्थ मी नाराज आहे असा त्याचा अर्थ होत नाही.’

आणखी वाचा-अखेर अजित पवार यांची कबुली… म्हणाले, ‘कांदा प्रश्नामुळे चार जिल्ह्यांत फटका…’

दरम्यान, राज्यसभेच्या जागेसाठी देखील पक्षांतर्गत वारंवार बैठका झाल्या. सर्वानुमते सुनेत्रा पवार यांचे नाव जाहीर झाले. माझी खासदार होण्याची इच्छा आहेच. परंतु, त्याचा अर्थ मी नाराज आहे, असा होत नाही. विरोधक चुकीच्या बातम्या माध्यमांतून पेरत आहेत. लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिल्याने आणि संविधान बदणार असल्याचा विरोधकांनी खोटा प्रचार केला. परिणामी आदिवासी, दलित आणि मुस्लिम समाज दूर गेला. त्यामुळे महायुतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज होणे स्वाभाविक आहे, असेही भुजबळ यांनी या वेळी सांगितले.

आणखी वाचा-राज्यसभेच्या उमेदवारी वरून छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा; अजित पवार म्हणाले, “आमच्या जवळच्या काही मित्रांनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भिडे वाड्यासाठी लढतो, पण प्रगती नाही

भिडे वाड्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढतो, पण त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. दोन-अडीच महिने आचारसंहिता आणि निवडणुकीत गेले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले याठिकाणी राहत होते. याठिकाणी बालसंगोपन केंद्र आहे, विहीर आहे. याठिकाणी ५०० लोक देखील बसू शकत नाहीत. त्यामुळे जवळची जागा मोकळी करावी आणि ३०० मीटरवर असलेले सावित्रीबाईचे स्मारक जोडण्यात यावे, यासाठी प्रयत्न करत आहे, पण यात काही प्रगती होत नाही, असे भुजबळ यांनी सांगितले.