पुणे : पतीपासून विभक्त झालेल्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिंहगड रस्ता भागात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध पर्वती पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपाली जाधव (वय २९, रा. अण्णा भाऊ साठे वसाहत, सिंहगड रस्ता) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तुषार दादा कांबळे (रा. बावडा, ता. इंदापूर) आणि प्रवीण रामचंद्र चोपडे (रा. खंडाेबा माळ, आकुर्डी, पिंपरी-चिंचवड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपालीचे भाऊ अभिजित सुधाकर भोसले (वय २३, रा. शाहुनगर, श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सिंहगड रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे वसाहतीत २६ मे रोजी सायंकाळी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली जाधवचा विवाह झाला होता. मात्र, पतीशी पटत नसल्याने ती गेल्या सहा-सात महिन्यांपासून आईकडे राहत होती. माहेरी राहत असताना तिचे तुषार कांबळे याच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले. तिने कांबळे याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. त्याने विवाहास नकार दिल्याने ती नैराश्यात होती. आरोपी प्रवीण चोपडे याने तिला दूरध्वनी करून धमकावले होते. नैराश्यातून दीपालीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक नामदे तपास करत आहेत.