पुणे : बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी खडकवासला-फुरसुंगी बोगदा प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली असून केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयाकडून या प्रकल्पाला मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात उरूळीदेवाची येथे काम सुरू करण्यात आले आहे.

खडकवासला ते फुरसंगी बोगदा हा खडकवासला धरणातून फुरसुंगीपर्यंतचा मुठा उजवा कालवा बंद करून त्याऐवजी तयार करण्याचे प्रस्तावित आहे. पाण्याची बचत करणे, पर्यावरणाची हानी टाळणे, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला राज्य शासनाचीही तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. त्यामुळे बोगद्यासाठी सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला होता. मात्र भूमिपूजनाला वेळ मिळत नसल्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू होण्यास विलंब होत असल्याची चर्चा रंगली होती.

या प्रकल्पांतर्गत खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान २८ किलोमीटर लांबीचा बोगदा प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी निविदा काढून काम देण्यात आले होते. संबंधित कंपनीकडून याबाबतचा अहवाल तांत्रिक जलसंपदा विभागाकडून तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला होता. या समितीने मध्यंतरी त्या अहवालात किरकोळ त्रुटी काढल्या होत्या. त्या दुरुस्त करून दिल्यानंतर समितीने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला होता. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे २.८ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच शहराला दोन महिने पुरेल एवढे पाणी वाचणार आहे. तसेच, पाणीगळती कमी होऊन शेतीलादेखील पाणी मिळण्यास मदत होणार आहे.

राज्य शासनाकडून या प्रस्तावाला विलंबाने सहमती दर्शविण्यात आली. त्यानंतर राज्य शासनाकडून हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता. मात्र पाच महिन्यांच्या कालावधीनंतर बोगद्याचे काम करण्यास केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पाचे काम हैदराबाद येथील एका कंपनीला देण्यात आले असून अडीच वर्षात प्रकल्पाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.