पुणे : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाच्या कडेला मासेमारी करणाऱ्या तरुणाचा वीज कोसळून मृत्यू झाला, तर दौंड शहरात दुकानाचा काही भाग कोसळून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटना घडल्या.संतोष गुलाब खांडवे असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील मौजे पाईट-रौंधळवाडी परिसरात भामा आसखेड धरणाच्या कडेला सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास खांडवे मासेमारी करत होता. त्या वेळी अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली. वीज कडाडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली, तेव्हा खांडवे जळालेल्या अवस्थेत सापडला. त्याला मित्रांनी तातडीने पाईट गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.

या घटनेची माहिती मिळताच मंडल अधिकारी एम. एस. सुतार, ग्राम महसूल अधिकारी एम. जी. क्षीरसागर, पाईट ग्रामपंचायत अधिकारी ए. एन. फुलपगर, उपसरपंच जयसिंग दरेकर, दीपक डांगले, अनिल रौंधळ, विपुल खेंगले, कबीर रौंधळ, हरिभाऊ रौंधळ, नवनाथ डांगले यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रशासनाकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. ‘खांडवे याच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, तसेच पाईट परिसरात वीज प्रतिबंधक मनोरा बसविण्यात यावा,’ अशी मागणी जयसिंग दरेकर यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दौंडमध्ये भिंत कोसळून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

दौंड शहरात दुकानाचा काही भाग कोसळून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घटना घडली. या घटनेत ताराबाई विश्वचंद्र आहेर (वय ७५) यांचा मृत्यू झाला. ‘आहेर यांचे दौंडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वैष्णवी फ्लाॅवर मार्ट नावाचे दुकान आहे. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आहेर दुकानात थांबल्या होत्या. दुकानातील भिंतीचा जीर्ण झालेला भाग आहेर यांच्या अंगावर कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने दौंडमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला,’ अशी माहिती दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली. तहसीलदार ममता भंडारे यांना घटनेची माहिती कळविण्यात आली.