Pune ZP Aditi Parthe Selected for NASA tour: अमेरिकेतील जगविख्यात अवकाश संशोधन संस्था नासाबद्दल अनेकांना कुतुहल वाटत असतं. पुण्याच्या भोर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत (झेडपी) शिकणाऱ्या १२ वर्षांच्या अदिती पार्ठेची नासाच्या दौऱ्यासाठी निवड झाली आहे. अदिती पार्ठेचे कुटुंबिय अतिशय बिकट परिस्थितीतून वाट काढत तिचे शिक्षण करत आहेत. तिचे वडील हमालीचे काम करतात, घरात कुणाकडेही स्मार्टफोन नाही. अदितीने कधी ट्रेननेही प्रवास केलेला नाही. अशात आता ती थेट अमेरिकेचा दौरा करणार असल्यामुळे तिच्या पालकांसह जिल्हा परिषदेच्या शाळेलाही आनंद पारावर उरला नाही.

निगुडघर येथील झेडपीच्या शाळेत जाण्यासाठी अदिती रोज सकाळी पायी ३.५ किमींचा प्रवास करते. सायंकाळी ५ वाजता शाळा सुटल्यानंतर पुन्हा तासभर पायी चालून घरी येते. अदितीचे वडील पुण्याच्या मार्केट यार्डात हमालीचे काम करतात. तर आई गावाला राहते. भोर तालुक्यात मावशीच्या घरी राहून अदिती शिक्षण घेत आहे.

अदितीच्या मुख्याध्यापकांनी जेव्हा तिला ही बातमी दिली तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्या मावशीला ही बातमी सांगितल्यानंतर तिला काय बोलावे हे कळत नव्हते. मी आईला सकाळी फोन करून सांगितले की, मी अमेरिकेला जाणार आहे.

अदितीची मावशी मंगल कंक यांनी सांगितले की, आम्ही लहानपणापासून अदितीला वाढवले. आमच्यापैकी कुणीही विमानही पाहिलेले नाही. आता अदिती एकट्याने एवढ्या लांब विमानातून प्रवास करणार आहे. आमच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. आमच्या गावात अनेक लोक हमालीचे काम करतात. जर शिक्षण घेतले नाही तर हमाली करण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे मुलांनी शिकून मोठे व्हावे, एवढेच स्वप्न आम्ही पाहतो.

Aditi Parthe pune house
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात अदितीच्या मावशीच्या घराची पडझड झाली. (Express Photo/Pavan Khengre)

स्थानिक माध्यमांनी ही बातमी दिल्यानंतर अदितीला शाळेत जाण्यासाठी एक सायकल आणि बॅग देण्यात आली आहे. तसेच तिच्या शाळेतील शिक्षिका वर्षा कुठवाड यांनी लॅपटॉपची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, अदिती क्रीडा, वक्तृत्व आणि नृत्यातही पारंगत आहे. तिच्यात काहीतरी वेगळेपण आहे.

नासाच्या दौऱ्यासाठी निवड कशी झाली?

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी, तसेच संशोधन वृत्ती विकसित होण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना अमेरिकेतील ‘नासा’, तसेच भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) या अवकाश संशोधन संस्थांची भेट घडविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. यासाठी आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोलभौतिकी केंद्राच्या (आयुका) सहकार्याने विद्यार्थ्यांची निवड चाचणी घेतली गेली.

या उपक्रमाच्या माध्यमातून घेतलेल्या परिषेनंतर ‘नासा’ येथील भेटीसाठी २५, तर ‘इस्रो’ येथील भेटीसाठी ५० विद्यार्थ्यांची निवड केली गेली आहे. आयुकाच्या सहकार्याने यावर्षी ऑगस्ट महिन्यात तीन टप्प्यात ६ वी आणि ७ वी मधील ७५ झेडपी शाळांमध्ये एमसीक्यू परीक्षा घेतली गेली. तब्बल १३,६७१ विद्यार्थी या परीक्षेला बसले. पहिल्या टप्प्यातीस १० टक्के विद्यार्थ्यांची दुसऱ्या टप्प्यासाठी निवड झाली.

Aditi Parthe pune ZP school
निगुडघर येथील झेडपीच्या शाळेतील शिक्षक आणि अदिती पार्ठे (Express Photo/Pavan Khengre)

पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ गजानन पाटील यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना जास्त अनुभव मिळत नाही. हे लक्षात आल्यानंतर आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांना नासा आणि इस्रोमध्ये पाठवण्याचा विचार केला. जेणेकरून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होईल. त्यांना खगोलशास्त्र किंवा विज्ञानाच्या शाखेत रस निर्माण होईल.

नासा दौऱ्यात विद्यार्थ्यांबरोबर तीन जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, आयुकाचे दोन कर्मचारी आणि एक वैद्यकीय अधिकारी प्रवास करणार आहेत. या योजनेसाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन विकास समितीमधून एकूण २.२ कोटींचा निधी खर्च केला जणार आहे.