गौरव सोमवंशी

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!

दोन वा अनेक व्यक्तींमध्ये आर्थिक व्यवहार होण्यासाठी त्यांचा परस्परांवर विश्वास असणे गरजेचे. पण व्यवहारांत विश्वास ठेवण्याची अपरिहार्यता असूच नये आणि तरीही ते सुरळीत पार पडावेत, अशी व्यवस्था कशी उभारायची?

अ‍ॅलिस, बॉब, चार्ली आणि डीलन यांचा परिचय मागील लेखात झाला आहेच. ग्रँट सॅण्डर्सन यांनी दिलेल्या उदाहरणातील हे चौघे नुकतेच एका महाविद्यालयात प्रवेश घेऊन एकाच सदनिकेत राहताहेत. एकमेकांसोबत केलेल्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी ठेवण्यासाठी हे चौघे विश्वासाने एक परिपूर्ण डिजिटल नोंदवही बनवू पाहतात. गेल्या लेखात त्याबद्दल माहिती घेताना हेही दिसले की, हे करताना त्यांच्यासमोर काही प्रश्न निर्माण झाले. या प्रश्नांची उत्तरे शोधताना काही मार्गदर्शक सूचनाही मिळत गेल्या.

पहिला प्रश्न : व्यवहाराची नोंद नेमकी त्याच व्यक्तीने केली हे कसे ओळखायचे?

सूचना : त्यासाठी डिजिटल स्वाक्षरी वापरावी- जेणेकरून फक्त अधिकृत नोंदीच डिजिटल नोंदवहीत जातील.

दुसरा प्रश्न : पण या अधिकृत नोंदी कोणी नकलून (कॉपी करून) तशाच नोंदवहीत टाकल्या तर? व्यवहार-नोंदींना अद्वितीय कसे बनवायचे?

सूचना : त्यासाठी अनुक्रमणिका वापरून प्रत्येक नोंदीला त्या-त्या अनुक्रमणिकेच्या आकडय़ाशी जोडून द्यावे. अनुक्रमणिकेतील प्रत्येक आकडा हा अद्वितीय असल्यामुळे, त्यासोबत जोडलेली प्रत्येक नोंदसुद्धा अद्वितीय असेल. कोणालाही नकलून तीच नोंद टाकता येणार नाही. ‘बिटकॉइन’मध्ये अनुक्रमणिकेचे हे काम ‘वेळ’ करते, ज्यास तांत्रिक परिभाषेत ‘टाइम-स्टॅम्प’ असे म्हटले जाते.

नंतर आपण जी समस्या पाहिली, ती फारच ‘मानवी’ म्हणू शकतो. समजा, महिन्याअखेरीस चार्लीने १,२०० रुपये देणे आहेत; पण तो थेट नकार देत असेल तर? परंतु अशी परिस्थितीच उद्भवणार नाही यासाठी आपण काय करू शकतो? तर.. महिना सुरू झाल्यावर काही ठरावीक रक्कम एका सामायिक ठिकाणी सुरक्षित ठेवू शकतो. हे करता करता आपण नोंदवहीत एक सुधारणा करायची; तिला थोडे ‘स्मार्ट’ बनवायचे. समजा- अ‍ॅलिस, बॉब, चार्ली व डीलन यांनी मिळून सुरुवातीलाच प्रत्येकी एक हजार रुपये सामायिक खात्यात टाकले. यामुळे आपली डिजिटल नोंदवही थोडी स्मार्ट झाली आहे. ती प्रत्येकाचा खर्च मोजत राहते आणि ज्या क्षणी कोणी आपल्या जमा रकमेपेक्षा अधिक खर्च करू पाहील वा त्यापेक्षा अधिक उसने घेईल, तेव्हा डिजिटल नोंदवही ती नोंद होऊच देणार नाही. यामुळे कोणी नसलेले पैसे कोणास द्यायचे वचन वगैरे देणार नाही. म्हणजे, प्रत्येकाने सुरुवातीला काही रक्कम जमा केली तरच त्याला पुढील व्यवहार करता येतील.

या चौघांनी ही डिजिटल नोंदवही कोण्या एका संकेतस्थळावर ठेवली आहे असे समजू. पण त्या संकेतस्थळावर कोणाचे नियंत्रण आहे? ते कोण्या बाहेरील व्यक्ती किंवा संस्थेकडे असल्यास- ‘फक्त या चौघांतच तिचे सर्व अधिकार-नियंत्रण असावे’ हे आपले मूळ उद्दिष्ट फोल ठरेल. तसेच या ‘चौघांपैकी फक्त एकाकडे’ संकेतस्थळाचे नियंत्रण दिले, तर त्या एकावर इतरांना ‘विश्वास’ ठेवावा लागेल. पण आपल्याला अशी प्रणाली बनवायची आहे, की कोणावर विश्वास ठेवण्याची गरजच पडू नये. सारी विश्वासार्हता त्या प्रणालीतच अंतर्भूत असेल. मग या समस्येवर मार्ग काय?

तर.. आपण ही नोंदवही कोणा एकाकडे न ठेवता, प्रत्येकाला त्या डिजिटल नोंदवहीची प्रत त्यांच्या-त्यांच्या नियंत्रणात देऊ (पाहा : सोबतची चित्राकृती). म्हणजे असे की, अ‍ॅलिस, बॉब, चार्ली आणि डीलन- प्रत्येकाकडे त्यांच्या नोंदवहीच्या प्रती असतील. मग ही प्रणाली कशी काम करेल? कोणा एकाकडे सगळे नियंत्रण नसेल तर त्यास आपण विकेंद्रित प्रणाली म्हणतो. या लेखमालेच्या तिसऱ्याच लेखात (‘एकाच वेळी सगळीकडे आणि सर्वाचे..’, १६ जानेवारी) आपण हे पाहिले होते की, ‘बिटकॉइन’ची व्याख्याच ‘वितरित-विकेंद्रित नोंदवही’ अर्थात ‘डिस्ट्रिब्युटेड-डिसेन्ट्रलाइज्ड लेजर’ अशी आहे. आता आपल्याला वरील उदाहरणातील डिजिटल नोंदवहीला वितरित वा विकेंद्रित करायचे आहे. प्रत्येकाकडे स्वत:ची प्रत देऊन आपण वितरित तर केलेच. वितरित म्हणजे एखादी प्रणाली अनेक ठिकाणी विखुरलेली असणे. उदाहरणार्थ, बँकेची शाखा एकाच ठिकाणी असली तरी आपण आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी कोणतेही, कुठलेही एटीएम वापरू शकतो. पण बँक या एकाच संस्थेच्या नियंत्रणात असल्यामुळे ती एटीएम केंद्रित (सेन्ट्रलाइज्ड) आहेत. आपल्या उदाहरणात (आणि अर्थात ‘बिटकॉइन’मध्येही) नुसते वितरित करून चालणार नाही, तर ही प्रणाली विकेंद्रितसुद्धा करावी लागेल. म्हणजे त्या डिजिटल नोंदवहीवर कोणा एकाचा अधिकार नसेल, तर सर्वाचा समान अधिकार असेल!

पुढील समस्या व त्यांचे निराकरण करण्यापूर्वी आपण एकदा पाहू की आपण काय बनवले आहे. अ‍ॅलिस, बॉब, चार्ली आणि डीलन यांनी आपल्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी ठेवायला एका डिजिटल नोंदवहीपासून सुरुवात केली आणि आपण इथपर्यंत पोहोचलो. आता समजा, या जगामध्ये हे चौघेच आहेत आणि ते ही डिजिटल नोंदवही वापरून आपले सगळे व्यवहार नोंदवत आहेत. काही वेळाने त्यांना जाणवते की, सगळे आर्थिक व्यवहार आपण मोजत गेलो, तर कधी वेगळे पैसे वापरण्याची गरज पडेल काय? हे चारच जण आहेत आणि सगळ्या नोंदी होत आहेत, अशा वेळी वेगळे पैसे का छापायचे? आपण याच नोंदवहीतील व्यवहारांना बाहेरील जगातील पैशावर अवलंबून न ठेवता, स्वत:च एक चलन देऊन पाहिले आणि त्याच्यातच नोंदी केल्या तर काय होईल?

आपण त्या चलनाला ‘नोंदवही-चलन’ म्हणू. म्हणजे कोणी काही काम केले की त्या कामाच्या मोबदल्याचे मूल्य या ‘नोंदवही-चलना’त मोजून तसे लिहू. बाहेरील जगातील पैशाचा वापर आपण काही वेळ थांबवू व सगळ्या नोंदी या ‘नोंदवही-चलना’त करून पाहू. या ‘नोंदवही-चलना’ची खासियत अशी की, प्रत्येक ‘नोंदवही-चलन’ हे कुठून आले, त्याचा इतिहास हे सगळे आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे कोणी काही खोटे व्यवहार नोंदवण्याचा संबंधच नाही. कारण प्रत्येक ‘नोंदवही-चलना’ची उगमापासून तुमच्या खात्यात येण्यापर्यंतची यात्रा पारदर्शक असेल.

तर.. ‘बिटकॉइन’ म्हणजे हे ‘नोंदवही-चलन’! तुमच्या सगळ्या आर्थिक व्यवहारांचा इतिहास हेच ‘बिटकॉइन’चे चलन असते. ‘बिटकॉइन’ अशी कोणती वेगळी वस्तू अस्तित्वात नाही. नोंदवहीच्या पलीकडे या ‘बिटकॉइन’ला काहीच अर्थ नाही; कारण ती फक्त डिजिटल नोंदवहीतील प्रत्येक व्यवहाराचा इतिहास सांगणारी एक संकल्पना, एक प्रणाली आहे.

समजा, आता आपण अ‍ॅलिस, बॉब, चार्ली आणि डीलन या चौघांपुरते हे मर्यादित न ठेवता प्रत्येकालाच या प्रणालीचा भाग बनवले तर? प्रत्येक जण आपापले आर्थिक व्यवहार हे एकाच जागतिक डिजिटल नोंदवहीत टाकत गेले तर? फक्त कल्पना म्हणून विचार करून पाहा, की असे केल्यास वेगळे पैसे छापायची गरज पडेल का? सगळे व्यवहार हे ‘नोंदवही-चलना’त होऊ लागले, तर वेगळे पैसे छापायची गरज आहे का? ‘पैशाचा इतिहास’ (२३ जानेवारी) या लेखात आपण यॅप बेटांवरील दगडी चलनाबद्दल जाणून घेतले होते. त्यात आपण पाहिले की, एक दगडी चलन महासागरात बुडाले होते, तरीसुद्धा त्या दगडाची नोंद प्रत्येकाच्या स्मृतीत होती आणि म्हणून त्या बुडालेल्या दगडानेही व्यवहार झालेच होते. म्हणजे दगड एकाच ठिकाणी असून त्याची फक्त मालकी बदलत जायची. जर त्या बुडालेल्या दगडाची नोंद प्रत्येकाच्या स्मृतीत असेल तर त्यांना तो दगड महासागराबाहेर काढण्याची गरज आहे का? यॅप बेटांवरील दगडी चलनाचे लोकांच्या स्मृतीवरून चाललेले व्यवहार आणि आपली डिजिटल नोंदवही यांत काय साम्य आढळतेय का, पाहा!

चलनाला त्याची खरी ताकद ही त्यावरील विश्वासाने आणि प्रत्येकाच्या मान्यतेने मिळते. उदाहरणार्थ, आपण म्हणतो की रंगलेली किंवा फाटलेली नोट ‘चालणार नाही’? पण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत फाटलेली नोट ‘चालेल’ असे बँकांसह प्रत्येक व्यक्तीने ठरवले, तर ती नोट ‘चालेल’ की नाही? कारण आपले पैसेसुद्धा एका नोंदीचे काम करतात (आठवतेय का : ‘मैं धारक को.. रुपये अदा करने का वचन देता हूँ।’)! ‘बिटकॉइन’चे चलन म्हणजे नोंदवहीतील सर्व व्यवहारांच्या नोंदींचा उगमापासून सुरू झालेला इतिहास!

परंतु येथे आपल्या सगळ्या समस्या संपल्या असे नाही. त्यामुळे अ‍ॅलिस, बॉब, चार्ली आणि डीलन यांची भेट पुढील लेखातही होणार आहेच!

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईमेल : gaurav@emertech.io