News Flash

अर्श दिलबागी

श्वासाचे रूपांतर शब्दांत करू शकणारे उपकरण पानिपतच्या अर्शसिंह दिलबागी याने तयार केले, ते गूगलच्या सायन्स फेअरसाठी पाठविले आणि गूगलने त्याची निवड १५ अंतिम स्पर्धकांमध्ये केली!

| September 15, 2014 03:05 am

श्वासाचे रूपांतर शब्दांत करू शकणारे उपकरण पानिपतच्या अर्शसिंह दिलबागी याने तयार केले, ते गूगलच्या सायन्स फेअरसाठी पाठविले आणि गूगलने त्याची निवड १५ अंतिम स्पर्धकांमध्ये केली! ‘रोबो’ हे त्याचे टोपणनाव यापूर्वीही अनेकदा सार्थ ठरले होते, त्यापैकी हे सर्वात ताजे यश.
हे उपकरण दोन भागांचे आहे. एक भाग संवेदकाचा, तर दुसरा यांत्रिक आवाजाचा. यापैकी संवेदक नाकाशी किंवा तोंडाशी लावून तारायंत्राच्या ‘मोर्स कोड’ भाषेप्रमाणे श्वास सोडला, तर त्या भाषेचे मानवसदृश यांत्रिक आवाजात रूपांतर होऊ शकते. तोंडून शब्द न फुटणे म्हणजे सरसकट मूकबधिरपणा नव्हे. एलआयएस (लॉक्ड इन सिंड्रोम) किंवा एएलएस (अ‍ॅमिओट्रॅफिक लॅटरल स्लेरॉसिस) या कारणांमुळेदेखील बोलणे अशक्य होऊ शकते. असा विकार असलेल्यांचे प्रमाण जगाच्या लोकसंख्येत १.४ टक्के – म्हणजे  जर्मनीच्या लोकसंख्येएवढे आहे, असे ‘रोबो’नेच त्याच्या या प्रकल्पाच्या संकेतस्थळावर म्हटले आहे.  अर्श ऊर्फ ‘रोबो’ याचे हे यश एका प्रकल्पापुरते नाही. लहानपणापासून त्याने अनेकदा आपल्या बुद्धीची चमक दाखविली होती.
पानिपतच्या डीएव्ही कनिष्ठ महाविद्यालयात, ‘रोबो’ बारावीत शिकतो. त्याचा जन्म २३ मार्च १९९८ रोजीचा. डीएव्ही शाळेतच तो शिकला. वक्तृत्वस्पर्धात इयत्ता पाचवीपासून, म्हणजे २००८ पासून पारितोषिके मिळवणारा अर्श नववीत होता, तेव्हापासून त्याला तंत्रज्ञान आणि संगणक यांची गोडी लागली. ‘इंडियन रोबो ऑलिंपियाड’ स्पर्धेत २०१० आणि २०११ सालची पारितोषिके त्याने मिळवली आणि लेगोच्या रोबो-स्पर्धेचा चषक मिळवला. २०११ सालच्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात, उत्तर विभागात अव्वल ठरल्यामुळे त्याला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याहस्ते पारितोषिक मिळाले होते. हरयाणा राज्यात अव्वल ठरल्याबद्दल त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी २०१२ साली गौरव केलाच, पण त्यापुढील वर्षी पुन्हा राष्ट्रपतींच्या हस्ते अर्शला सन्मानित करण्यात आले. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान खात्याच्या ‘इन्स्पायर योजने’त निवड झाल्याबद्दल २०१३ साली राष्ट्रपती भवनात हा सत्कार सोहळा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झाला होता.
रोबोटिक्स अथवा यंत्रमानवशास्त्राची आवड अर्शला आहेच, परंतु हे साधन मानवाच्या उपयोगी किती पडते हे महत्त्वाचे, असे तो मानतो, विज्ञानाने मानवाचे भलेच करायला हवे, हे त्याला लहानपणीच शिकवले आयझ्ॉक असिमोव्हच्या विज्ञानकथांनी. विज्ञानविषयक वाचनाच्या याच आवडीने त्याला स्टीफन हॉकिंग यांचाही चाहता बनविले. पण त्याचा आदर्श विचाराल तर तो सांगेल, अ‍ॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज, ज्यांनी विज्ञानाला जणू मानवोपयोगी कलेच्या उंचीपर्यंत पोहोचवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2014 3:05 am

Web Title: arsh shah dilbagi
Next Stories
1 नील मुखर्जी
2 कमल बावा
3 कावेरीताई पाटील
Just Now!
X