संवाद-चर्चेच्या पुस्तकांची इंग्रजीत चांगली परंपरा आहे. एडवर्ड सईद, इसाया बर्लिन, मिशेल फुको, माक्र्वेझ, एरिक हॉबसॉम यांच्याशी केलेल्या संवादाची पुस्तके वाचताना तत्त्वज्ञान, इतिहास, कला अशा गोष्टी सहजपणे समजावून घेता येतात. इटालियन लेखक, विचारवंत उम्बतरे इको आणि फ्रेंच लेखक आणि पटकथाकार जॉ-क्लॉड कॅरिअर यांनी वाचनसंस्कृतीवर केलेल्या गप्पांचे पुस्तक गतवर्षी प्रसिद्ध झाले. हे दोघे एकमेकांना प्रश्न विचारताना काही मुद्दे तपशिलाने मांडतात. पहिल्याच प्रश्नात कॅरिअर म्हणतात २००८मध्ये दावोसमध्ये एका भविष्यवेत्त्याने म्हटले की पुढील ५० वर्षांत चार गोष्टींनी मानवतेवर मोठा परिणाम होईल- १. पेट्रोलचा भाव ५०० डॉलर प्रति बॅरल होईल. २. पाणी हे तेलाप्रमाणेच व्यावसायिक उत्पादन बनेल.      ३. आफ्रिका आíथक सत्ता बनेल आणि चौथे पुस्तके नष्ट होतील.
पुस्तके नष्ट झाल्याने इतर तीन गोष्टींसारखाच मानवतेवर परिणाम होईल का? त्यावर इको सांगतात- ‘‘मला अनेकदा हा प्रश्न विचारला जातो, ‘इंटरनेटच्या परिणामामुळे पुस्तके नष्ट होतील काय?’ लोकांना विशेषत: पत्रकारांना पुस्तके नाहीशी होतील या कल्पनेने घेरलेले असते. म्हणून ते हा प्रश्न विचारतात. इंटरनेटने आपल्याला बाराखडीपर्यंत नेलेले आहे. आपली संस्कृती जर दृश्यात्मक मानली तर प्रत्येकाला वाचावेच लागेल आणि त्यासाठी माध्यमाची गरज आहे. हे माध्यम केवळ संगणकाचा पडदा असू शकत नाही. दोन तास कादंबरी संगणकावर वाचा. डोळ्यांचा टेनिस बॉल होतो .’’ पुढे ते सांगतात-
‘‘दोहोतली एक गोष्ट होईल. एक म्हणजे पुस्तके वाचनाचे माध्यम राहील किंवा त्याचे स्वरूप बदलेल. छपाईचा शोध लागण्यापूर्वी त्याला जसे स्वरूप होते तसे स्वरूप त्याला येईल. गेल्या ५०० वर्षांत पुस्तकासारख्या वस्तू रूपांतरित झाल्याने त्याचे कार्य किंवा व्याकरण बदलले नाही. पुस्तक हे चमचा, कात्री, हातोडी किंवा चाक यांच्यासारखेच आहे. अशा गोष्टींचा शोध लागल्यावर त्यात फार बदल करता येत नाही. तुम्ही चमच्यात बदल करून अधिक चांगला चमचा बनवू शकत नाही.‘‘अर्थात चर्चा ई-बुकपर्यंत येते आणि इको म्हणतात- एक वकील २५००० कागदपत्रे ई-बुकवर साठवून सहज घरी नेऊ शकतो, पण खरंच ‘वॉर अँड पीस’ ई-बुकवर वाचता येईल याबाबत मला शंका आहे.
ही चर्चा जॉ-फिलिप दि टोनाक याने घडवली आहे. त्यामुळे ते अधेमधे दोघांनाही प्रश्न विचारतात. फ्लॉपी, व्हिडीओ टेप, अशी साधने आता मागे पडत आहेत, याकडे ते लक्ष वेधतात. पूर्वी २२१ भागांच्या ढं३१’ॠ्रं छं३्रल्लं (चर्चमधील धर्मोपदेशक आणि इतरांनी लिहिलेले साहित्य)ची सी. डी. रॉम ५०,००० डॉलरला होती. आता ती मोफत ऑनलाइन मिळते. हे बदल दोघांनाही स्वीकारार्ह वाटतात.
या चच्रेला विषयाचे बंधन नाही. एके ठिकाणी इको सांगतो- संस्कृती नेहमीच एक चलन लावत असते आणि आपण काय स्वीकारायचे आणि टाळायचे हे सांगते. गॅलिलिओने केलेली क्रांती समजून घ्यायची असेल तर आपल्याला ती टोलेमीच्या दृष्टिकोनातून समजून घेतली पाहिजे. त्यासाठी टोलेमीच्या मन:स्थितीत उतरायला हवे. कुठलीही चर्चा हे त्या समूहाने धारण केलेल्या ज्ञान विषयांच्या आधारेच करता येते. इंटरनेट आपल्याला हे सारे काही देते, पण त्यात काय काढून टाकायचे हे मेंदू ठरवतो, संस्कृती नाही. पूर्वी एखाद्या समुदायाचा एक ज्ञानकोश असायचा, पण इंटरनेटमुळे ६०० ज्ञानकोश तयार झाले यातून सर्वाना सामायिक असे काही असू शकत नाही.
शेवटी संस्कृतीत काय ठेवायचे आणि काय दुसऱ्या भाषेत न्यायचे हे कोण ठरवते हा प्रश्न दोघे वारंवार उपस्थित करतात. वाचन संस्कृतीत एका पद्धतीच्या वाचनाचा दुसऱ्या पद्धतीच्या वाचनावर परिणाम होतो. काफ्काने ‘डॉन किहोते’ वाचला होता हे त्याच्या लेखनावरून सांगता येते, पण एखाद्या वाचकाने काफ्का आधी वाचला आणि डॉन किहोते नंतर, तर त्या वाचनावर आधी काफ्का वाचल्याचा परिणाम होतो. पुस्तकात काही विवादास्पद मुद्दे आहेत. उदाहरणार्थ, तात्त्विक संकल्पना ही गोष्ट पूर्णपणे पाश्चात्त्य आहे असे कॅरिअर सांगतात.
यात शिक्षणाने फ्रान्सचा ग्रामीण वर्ग कसा बदलला? बंदी घातल्याने रश्दीच्या पुस्तकाबद्दल जागरूकता कशी निर्माण झाली? चीनमध्ये इंटरनेट सेन्सॉरशिप फिजूल आहे का? जिने एखादा कला प्रकार विकसित केला नाही अशी संस्कृती असते काय? चित्रपटात दोन प्रतिमा एकामागोमाग दाखवून काय परिणाम साधतो? अशा अनेक प्रश्नांची चर्चा  आहे. पण योग्यपणे मांडलेल्या प्रश्नात अध्रे उत्तर साठवलेले असते. इको आणि कॅरिअर प्रश्नांची मांडणी अचूक करतात. चित्रकला, संगीत, सिनेमा, साहित्य, मानववंशशास्त्र, तत्त्वज्ञान यातील हजारेक संदर्भ तरी या पुस्तकात सापडतील.

धिस इज नॉट द एंड ऑफ द बुक : उम्बर्तो इको आणि जॉ-क्लॉड कॅरिअर,
प्रकाशक : विंटेज बुक्स,  
पाने : ३३६, किंमत : ३९९ रुपये.