‘तारसेवा इतिहासजमा होणार’ ही बातमी (लोकसत्ता १३ जून) वाचून मन अस्वस्थ झाले.  काळाच्या ओघात जुन्या गोष्टी मागे पडून नव्यांचा उदय होणे हे निसर्गनियमाला धरूनच आहे. हे जरी खरे असले तरी जुन्याच्या वियोगाने मन व्याकूळ  होणारच. सुप्रसिद्ध कवी टेनिसन यांनी लिहिल्याप्रमाणे ‘ओल्ड ऑर्डर चेन्जेथ यील्डिंग प्लेस टु न्यू’ हे खरेच आहे. ‘तारसेवेने अतिशय निरलसपणे व निर्वकिारपणे लोकांची सेवा केली,’ असे लोकसत्ताच्या बातमीत म्हटले आहे, तेही खरेच! या सेवेने आनंदाच्या, दु:खाच्या बातम्या सारख्याच तटस्थतेने लोकांना पोहोचविल्या. कधी कधी तार बाबूंनी केलेल्या अभावित चुकांमुळे लोकांना मनमुराद हसविले. दिवंगत लेखक चिं. वि. जोशींनी लिहिल्याप्रमाणे gave bearth to a lady च्या ऐवजी gave birth toa lady  किंवा  Babuls marriage fixed with Limayels daughter  ऐवजी  Babuls garage mixed with soda water  असल्या विनोदांना आपण आता मुकणार आहोत. कालाय तस्म नम:!
– शरद फडणवीस, कोथरूड ( पुणे)
   
आता उरले ‘तारे’चे स्मरणरंजन..
कड कट्ट ही ध्वनीसंकेताची भाषा वापरणारी तार सेवा कायमची अस्तंगत होणार ही बातमी वाचून हुरहूर वाटली . इंग्रजांनी भारतात ज्या काही उत्तमोत्तम सुधारणा केल्या त्यात अग्रक्रम ठरलेली ही तारसेवा होती. पूर्वीच्या काळात तारेचा संकेत अशुभ बातमीशी सतत जोडला जात असे. त्यामुळे नुसती ‘तार आली’ असं कोणी उच्चारलं तरी घरातल्या सगळ्यांना धडकी भरयची. महिलांमध्ये निरक्षरतेचे प्रमाण अधिक असल्यानं त्या तारेचं पाकीट फोडण्याचं धाडस सहसा करीत नसत. तार उघडणे आणि वाचणे हा एक अभूतपूर्व सोहळाच असायचा दूरस्थ, अत्यवस्थ, वृध्द व्यक्ती असल्यास तार ‘फोडण्या’ साठी फारच काळजी घेतली जात असे. अशावेळी जेवणंखावणं आटोपून टोप्या, फेटे, पगडय़ा खुंटीला टांगून कोणी तरी धीराचा माणूस तार वाचन करायचा! तिनं ‘निधना’ची वार्ता आणली असेल तर त्या वेळेपासून कुटुंबाचं ‘सुतक’ आणि बायकांची किमान दहा दिवस पुरणारी रडारड सुरू व्हायची !
 तार आनंदाच्या बातम्याही घेऊन येते यावर जुन्या माणसांचा विश्वासच नसायचा. ही इंग्रजांची देणगी असल्यामुळे तिचा मसुदा त्याच भाषेत असावा या अलिखित संकेताच दडपण भल्याभल्यांवर असायचं! १८९५ साली ना.वा. टिळक यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला . लक्ष्मीबाई एकटय़ा पडल्या. टिळकांना एक दिवस प्रार्थनेतून त्यांच्या भेटीला जाण्याचं उत्तर मिळालं . त्यानुसार त्यांनी GO, SAYS, COMMING अशी तार पाठवली . ती तार मास्तरांनी ‘गोसावी किमग’ अशी लिहून पोच केली पुढे १९०० साली लक्ष्मीबाई ख्रिस्ती झाल्या आणि टिळक खरोखरच नि:संग गोसावी झाले! तार मास्तराची गफलत अशा रीतीनं सत्य ठरली !!
– प्रा. विजय काचरे

कराच्या सक्तीपेक्षा बिलाविषयी आसक्ती हवी..
राजीव साने यांच्या ‘कर नाही त्याला डर(विता) कशाला’ हा लेख वाचला.  ‘मला जो कर पडणार तो काढताना पुरवठादाराने अगोदरच भरलेला कर वजा टाकायला मिळाला तर अगोदरच्याने कर भरलेला असणे हा माझा स्वार्थ होतो ,’ मला इथे थोडे अधिक स्पष्टीकरण हवे होते, असे मला वाटले.   
या करप्रणालीत वस्तूवर कर अगोदरच घेतला जातो आणि जेव्हा ती वस्तू हस्तांतरित होते तेव्हा ज्याच्या हातून जाते त्याला तो परत मिळतो. पण त्यासाठी वस्तू हस्तांतरित झाली हा पुरावा दाखवावा लागतो. तो म्हणजे विक्रीचे बिल दाखवावे लागते. विक्रीचे बिल दाखवले की खरेदीच्या वेळीस भरलेला कर परत मिळतो. असे झाल्याने अंतिम ग्राहकाने बिल जरी मागितले नाही तरी विक्रेता ते बिल फाडतो आणि आपला कर परतावा घेतो. अंतिम ग्राहक हा विस्तृत आणि विखुरलेला आहे. त्याच्यावर लक्ष ठेवणे अशक्य असते.  त्याने एकदा बिल नको असे म्हटले की, रोखीच्या बिनबिलाच्या व्यवहारांची साखळी तयार होते ती थेट कारखान्यातून उत्पादनाची बॅचच कर न भरता बाहेर निघण्यापर्यंत पोहोचते आणि कराच्या जाळ्यातून हा साराच व्यवहार सुटतो. आधुनिक करप्रणालीत मात्र कर न भरणे हा ‘व्यक्तीचा स्वार्थ’; कर भरणे या ‘सामूहिक स्वार्थात’ परिवर्तित केला जातो. हे साधले जाते ते बिलाविषयी सक्ती नव्हे तर ‘आसक्ती’ निर्माण करून!
डॉ. अजय ब्रह्मनाळकर

भागवताय नमो नम:!
डॉक्टर भागवतांच्या जालीम औषधाने अडवाणींचा आजार बरा झाला आणि व्यथाही दूर झाल्याने राजीनामाही परत घेतला गेला. परंतु हे झाले तरीही पुढील काळात भाजपमध्ये आणि त्याचबरोबर एनडीए तेसुद्धा ध्रुवीकरण होऊन फूट अटळ वाटते. येत्या लोकसभेच्या निवडणुकांत एनडीए पराभवाच्या दिशेने जात असल्याचे संकेत मिळू लागले होते. एनडीएतील सर्वात मोठा पक्ष भाजप. त्याची सूत्रे, कुणी कितीही नाकबूल केले तरी, नागपूरकर परिवारातून हलविली जातात हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे अडवाणीजींची समजूत घालण्यासाठी, सरसंघचालकांना शिष्टाई करणे भाग पडले. तह तर झाला पण तहाच्या अटी काय असतील याचा अजून तरी अंदाज येत नाही. ही युद्धसमाप्ती की तहकुबी हे लवकरच कळेल.
परंतु एक निश्चित की काँग्रेसचे शंभर अपराध अद्याप तरी भरले नसावेत!
चिदानंद पाठक , पाषाण (पुणे )

ये रे माझ्या मागल्या!
मुंब्रा येथील लकी कम्पाउंड, माहीम येथील अल्ताफ बििल्डग आणि पुणे-सातारा हायवेवर शिंदेवाडीजवळ झालेला अपघात अशा एकामागोमाग एक दुर्दैवी घटनांनंतर बेकायदा बांधकाम आणि जमिनीच्या अवैध वापराचा  प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पण हा प्रश्न केवळ आताचा नसून गेली अनेक वर्षे या ना त्या रूपात भेडसावत आहे. २६ जुल २००५ ला मुंबईत अतिवृष्टीने जेव्हा अनेकांना आपला जीव गमवावा लागला तेव्हासुद्धा या प्रश्नावर काही ठोस पावले उचलली जातील असे वाटले होते. पण आपल्याकडे एखादी दुर्घटना घडल्यावर चार दिवस त्या घटनेबद्दल कोणा-कोणाचे काय चुकले आणि काय करायला हवे यावर ऊहापोह होतो आणि या घटना मग विस्मृतीत जातात. आजही मुंबईत  धोकादायक म्हणून  जाहीर केल्या गेलेल्या इमारतींची संख्या निश्चितच मोठी आहे. ‘अशा घटना चालायच्याच’ ही दुर्बल मानसिकता सोडून या संबंधी ठोस पाऊल उचलण्यासाठी सरकारवर दबाव आणायला हवा. अन्यथा अजून एखादी ‘अल्ताफ’ कोसळेपर्यंत आपण तसेच शांत बसू, परत चार दिवस सर्व वृत्तवाहिन्यांचा टीआरपी वाढवायला हातभार लावू आणि पुन्हा सर्व काही ‘येरे माझ्या मागल्या.’
अभिषेक पराडकर,  वरळी (मुंबई)

महत्त्व पदवीला की कामाला?
बोगस पीएच.डी.चा मुद्दा लोकसत्ताने (बातम्या आणि ११ जून रोजीच्या ‘पीएच. डी.ची खुली दुकाने.. ’ या प्रा. सुरेश नाखरे यांच्या लेखातून) लावून धरला आहे त्याबद्दल अभिनंदन . सद्य स्थितीमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जी काही अनागोंदी चालू आहे त्याला जबाबदार आपणच आहोत. मधल्या काळात एमबीएचे पीक आले होते. आणि त्या आधी डीएड् महाविद्यालयांचे. इतकेच काय पत्रकारिता शिकविणाऱ्या महाविद्यालयांचे! मागणी तसा पुरवठा हे सूत्र जसे बाजार पेठेला लागू पडते तसे ते शिक्षण क्षेत्राला लागू पडते यात नवल ते काही नाही. आजमितीला भारतात विज्ञान क्षेत्रातून दरवर्षी हजारो विद्यार्थी डॉक्टरेट मिळवतात पण असे एकही संशोधन नाही की जे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले जावे. सध्या विद्यापीठीय संशोधन क्षेत्रात काही नवे करण्यापेक्षा जुन्याला नव्याचा मुलामा देऊन पुढे प्रदíशत करण्याचा प्रयत्न केला जातो हे स्वानुभवावरून (भारत सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाची शिष्यवृत्ती (रिसर्च फेलोशिप) मिळूनदेखील मला त्यातून बाहेर पडावे लागले) सांगतो. अशा प्रवृत्तींमुळेच भारत संशोधन क्षेत्रात मागे आहे.
सध्या नीट, आयईएलटीएस, टोफेल या परीक्षांसाठी चालणाऱ्या क्लासेसचे पीक आलेय. शिक्षण क्षेत्रात समांतर अर्थव्यवस्था आधीपासून अस्तित्वात आहे आणि अशा व्यवस्थेला छेद द्यायचा असेल तर आपण स्वत: चुकीच्या मार्गाचा अवलंब करणे थांबवले पाहिजे आणि दुसरा कुणी करत असेल तर त्यालाही परावृत्त केले पाहिजे. जिथे जिथे स्पर्धा आहे तिथे तिथे अवैध मार्गाचा वापर होईल यात नक्कीच शंका नाही आणि यात शिक्षणक्षेत्रदेखील मागे नाही. पण अनुभव आणि डिग्री यांचा दुरान्वयानेदेखील संबंध नसून आपण आजही एखाद्या पदवीला महत्त्व देतो तीच या क्षेत्राची शोकांतिका आहे आणि तेच अशा बोगसपणाचे मूळ कारण आहे.
– सुयोग गावंड, अहमदाबाद