चाळीस कोटी वर्षांपूर्वी मत्स्यावतारातून प्रगटलेले आपल्या कणखर पृष्ठवंशातले प्राणी क्रमेण भूमीवर पसरून हवेत भरारी घेत जीवसृष्टीचे अधिपती बनले आहेत. .
‘कणा’ कुसुमाग्रजांची एक सुंदर कविता आहे. नदीच्या पुरात ज्याचे सर्वस्व वाहून गेले असा त्यांचा एक विद्यार्थी भेटायला येतो, आपली कहाणी सुनावतो, मदत हवी का म्हटल्यावर सांगतो : ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा। पाठीवरती हात ठेवून फक्त ‘लढ’ म्हणा’. उगीच नाही आज साऱ्या जीवसृष्टीचे आधिपत्य करताहेत कणखर पृष्ठवंशी प्राणी! सायनोबॅक्टेरियांच्या, शेवाळ्यांच्या अब्जावधी वर्षांच्या प्रकाशाची ऊर्जा वापरण्याच्या खटाटोपात पाण्याचे विघटन होत राहून वातावरणात, पाण्यात प्राणवायूचे प्रमाण सतत वाढत राहिले. ते पन्नास कोटी वर्षांपूर्वी आजच्या पातळीला पोहोचले. हे वाढता-वाढता जीवांनी या प्राणवायूचा पुरेपूर फायदा उठवणारी रासायनिक यंत्रणा विकसित केली. त्यामुळे पन्नास कोटी वर्षांपासून उत्क्रांतीची गाडी भरधाव सुटली. भराभर हालचाली करू शकणारे नवनवे प्राणी उपजले आणि एकमेकांपासून बचाव करून घेण्यासाठी ते चिलखते पेहनू लागले. अशा जलद हालचाली करायला अंग बळकट हवे, तसेच लवचीकही हवे. हे दोन गुण एकत्र आणले पाठीच्या कण्याने.
जीवसृष्टी समुद्राच्या पाण्यात उपजली, तसेच पहिले पृष्ठवंशी समुद्राच्या तळावर अवतरले. मग नवनवी संसाधने वापरायला शिकत, नवनव्या अधिवासांत शिरकाव करून घेत ते सगळीकडे फैलावले; माशांच्या, कासवांच्या, देवमाशांच्या रूपाने पाण्यात, बेडकांच्या रूपाने पाण्याच्या कडेला, साप-सरडे, आपल्यासारख्या सस्तन पशूंच्या रूपात जमिनीवर आणि पक्ष्यांच्या, वटवाघळांच्या रूपात हवेत. हे सगळे साधले कण्याच्या सोबतच्या आणखी चार गुणवैशिष्टय़ांमुळे : अंगाला नेटका आकार देणारे खवले व त्यातून विकसित झालेली पिसे व केस, परिणामकारकरीत्या प्राणवायू शोषणारे कल्ले व नंतर विकसित झालेली फुप्फुसे, कल्ल्यांच्या हाडांपासून घडवलेले दणकट जबडे आणि संचारासाठी वल्ह्य़ांसारख्या परांच्या आणि त्यातून विकसित झालेल्या पायांच्या, पंखांच्या जोडय़ा. अर्थात हे सगळे क्रमाक्रमाने खुलले आणि जसजसे ते विकसित झाले तसतसे जीवसृष्टीच्या विस्तारवादी प्रवृत्तीनुसार पृष्ठवंशी जीवजाळ्यात नवनव्या भूमिका वठवू लागले.
आदिम पृष्ठवंशी सुमारे पन्नास कोटी वर्षांपूर्वी उपजले, तर आजच्या माशांचे सगेसोयरे चाळीस कोटी वर्षांपूर्वी. हे आदिमत्स्य गोलतोंडे होते, अजून जोरकस जबडय़ांनी, वल्ह्य़ांसारख्या परांनी सज्ज नव्हते. समुद्राच्या तळावर हळूहळू सरपटत, पोहत ते कृमी, गोगलगायी, खेकडय़ांवर चरत होते. पाठीला कणा होता आणि बाह्य़ांगावर खवल्यांचे बळकट कवच. याच्या जोडीला कूर्चा- कार्टलेिज अथवा हाडांचा सांगाडा होता. या सांगाडय़ावर स्नायू रोवून जोमाने हालचाली करता येत होत्या. तोंडातून पाणी घेऊन ते स्नायूंच्या जोराने गळ्याच्या भागातल्या फटीफटीतल्या कल्ल्यांवरून बाहेर ढकलत होते. या कल्ल्यांद्वारे पाण्यातला प्राणवायू परिणामकारकरीत्या रक्तात पोचवत होते. तोंडाने चांगला चावा घेणे, हालचाली आणखी जलद करणे फायद्याचे होते. यासाठी उत्क्रांतीच्या ओघात कल्ल्याला आधार पुरवणाऱ्या सांगाडय़ाचे रूपांतर झाले आधुनिक पृष्ठवंशींच्या जबडय़ात आणि सांगाडय़ातल्या इतर कूच्रेचे- हाडांचे खांदा-कमरेच्या सांगाडय़ात आणि दोन चलनाच्या अवयवांच्या जोडींत. मासे त्यांचे चलनाचे अवयव, पर वल्ह्य़ांसारखे वापरतात.
अशा आधुनिक रूपातले, पण आदिम माशांशी खूप साधम्र्य असलेले आजचे मासे आहेत शार्काचे भाईबंद रे मासे. बशीसारख्या चपटय़ा आणि पंचवीस सेंटिमीटरपासून सात मीटपर्यंतच्या आकाराच्या या माशांच्या पाचशे साठ जाती आहेत. यापैकी बहुतांश जाती समुद्रतळावर कृमी, गोगलगायी, खेकडय़ांवर चरतात, पण साऱ्या यशस्वी जीववर्गाप्रमाणे रे मत्स्यवर्गही नवनव्या आविष्कारांच्या साह्य़ाने परिस्थितीशी मिळवून- जुळवून घेत फैलावला आहे. यांत खास लक्ष वेधून घेतो समुद्रतळ सोडून पंखासारख्या पसरलेल्या पुढच्या पराच्या मदतीने वरच्या थरांत पोहणारा पाच मीटर राक्षसी आकाराचा मॅन्टा रे. त्यांच्या आकाराच्या मानाने त्यांचे भक्ष्य अगदी लहानगे असते, पाण्यात तरंगणारे छोटे-छोटे िझगे, खेकडे.
अशा विविध अधिवासांत फैलावत, वेगवेगळे भक्ष्य हाताळत, नवनव्या आविष्कारांच्या साहाय्याने आजमितीस खाऱ्या, गोडय़ा पाण्यातल्या माशांच्या सत्तावीस हजार जाती उत्क्रांत झाल्या आहेत; पण त्यापैकी सहा ते आठ हजार जाती समुद्रातील केवळ एक टक्का क्षेत्र व्यापणाऱ्या प्रवाळांच्या आसमंतात सापडतात. इतरत्र जलसृष्टीत काहीच खास रचनावैविध्य नसते, पण प्रवाळांच्या आसमंतात जमिनीवरच्या जंगलांसारखेच भरपूर रचनावैविध्य आढळते. यावर पोसले आहे मत्स्यसृष्टीचे वैविध्य, पण यातही वैविध्यातून अधिकाधिक वैविध्य कसे फोफावते हे दाखवून देतात इतर जातीच्या माशांच्या अंगावर वाढलेल्या उवांसारख्या परजीवी प्राण्यांची सफाई करणारे मासे. प्रवाळांच्या परिसरातल्या ही सेवा करणाऱ्या माशांची वर्तणूक चकित करते. हे तेल-मालिश-चंपीवाले आकाराने छोटे, त्यांच्या गिऱ्हाइकांनी सहज मटकावण्याजोगे, पण दोन्ही पक्षांत समझोता असतो- कुणीच विश्वासघात न करण्याचा. सफाई करून घ्यायला तिथे आलेले प्रवाळाच्या परिसरातले मासे आपल्यापासून धोका नाही हे दाखवण्यासाठी विशिष्ट पवित्रे घेतात. मग सफाईवाले धीर करून नुसते अंगावरचेच नाही, तर थेट तोंडात शिरून टाळूवरचे, कल्ल्यातले सारे जीवजंतू वेचून खातात, पण सफाई करून झाली की, त्यांची गिऱ्हाइके त्यांना गिळंकृत करत नाहीत. सेवक मासेही सफाई करता करता हळूच एक मांसाचा लचका तोडण्याच्या मोहात पडत नाहीत, पण सगळेच इमानदारीने वागतील तर काय हवे हो? या जलसृष्टीतही दगाबाज आहेतच. अशीच एक ब्लेनी कुळातली माशांची जात रास कुळातल्या सच्च्या सेवकांची नक्कल करते; तसेच रंग-रूप, तसेच नाचणे- मुरडणे, पण बेसावध मासे सफाई करून घ्यायला त्यांच्यापुढे थंडपणे येऊन ठाकले की पटापट मांसाचे लचके तोडून हे लुच्चे पलायन करतात. एवढेच आहे की निसर्गात यांचे प्रमाण आटोक्यात राहते. जरा वाढले की त्यांची सावजे सावध होतात. फसवणुकीला बळी पडायची थांबतात. मग यांची संख्या घटते. असे जीवसृष्टीचे रहाटगाडगे फिरत असते, ठकबाजीला घट्टपणे काबूत ठेवत.
साऱ्याच जीवसृष्टीच्या विस्तारवादी धोरणाप्रमाणे मासेही पाण्यात अडकून राहत नाहीत, त्यांच्या अनेक जातींनी जमिनीवर पदार्पण केले आहे. जिथे नद्या समुद्राला मिळतात तिथे भरपूर चिखल जमा होतो. या भरती-ओहोटीच्या परिसरात खारफुटीची राने फोफावतात. या चिखलावर पुढच्या परांचे वल्ह्य़ातून पायात रूपांतर केलेले छोटेछोटे मडस्किपर मासे बागडत असतात. पाच-दहा सेंटिमीटर आकाराचे हे मासे बारीक खेकडय़ांची, किडय़ांची शिकार करतात. मडस्किपर कल्ल्यांतून नाही, तर आपल्या ओलसर कातडीतून प्राणवायू शोषतात, पण माशांचा एक गट याहूनही विकसित झाला आहे- तो म्हणजे फुप्फुस माशांचा. या दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलियात गोडय़ा पाण्याच्या आसमंतात राहणाऱ्या माशांचे पुढच्या व मागच्या, दोन्ही परांचे जमिनीवर चालणाऱ्या पायांत रूपांतर झाले आहे आणि ते व्यवस्थित फुप्फुसांचा वापर करत प्राणवायू शोषतात. सारे पाणी आटले तरी चिखलात स्वत:ला पुरून घेऊन अनेक महिने सुखेनव जगतात. अशा कोणा मत्स्यावतारी पूर्वजांच्या कर्तबगारीनेच आज आपण सारे पृष्ठवंशी पशू भूतलावर बागडतो आहोत!
*लेखक ज्येष्ठ परिसर्ग-अभ्यासक आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jul 2014 रोजी प्रकाशित
मासे : जलजीवसृष्टीचे कणखर राजे
चाळीस कोटी वर्षांपूर्वी मत्स्यावतारातून प्रगटलेले आपल्या कणखर पृष्ठवंशातले प्राणी क्रमेण भूमीवर पसरून हवेत भरारी घेत जीवसृष्टीचे अधिपती बनले आहेत. .

First published on: 18-07-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व उत्क्रांतियात्रा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fish kings of water ecosystem