सीमेपलीकडच्या दहशतवादाविरोधात लढण्यासाठी देशातील सुरक्षा दल अधिक प्रगत करण्याच्या दृष्टीने सातत्याने वाटचाल सुरू असते. पण गेल्या दशकापासून सुरू झालेल्या सायबर हल्लेखोरांना रोखण्यासाठी मात्र अद्याप प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नाही. पाकिस्तानातून सायबर हल्ला झाल्यावर आपण त्यांचे एखादे संकेतस्थळ हॅक करून त्याचा आनंद साजरा करायचा हेच आजपर्यंत सुरू होते. यासाठी एक स्वतंत्र सायबर सुरक्षा अधिकारी असावा, अशी मागणी गेल्या तीन वर्षांपासून होत आहे. गेल्या वर्षांपर्यंत देशातील सायबर हल्ल्यांत साठ टक्क्यांनी वाढ झाली असून २०१४ च्या मध्यापर्यंत देशात साठ हजार संकेतस्थळांवर हल्ले झाले होते.‘डिजिटल इंडिया’साठी डिजिटल सुरक्षा यंत्रणाही अधिक सज्ज होणे गरजेचे आहे. यासाठीच डॉ. गुलशन राय यांना देशाचे पहिले ‘मुख्य सायबर सुरक्षा अधिकारी’ म्हणून नेमण्यात आले आहे.
 राय हे गेल्या २५ वर्षांपासून माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सायबर सुरक्षा, ई-प्रशासन, ई-कॉमर्स क्षेत्रासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा आदी क्षेत्रांत काम केले आहे. सध्या ते ‘इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’चे महासंचालक म्हणून कार्यरत होते.
यापूर्वी राय यांनी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत येणाऱ्या शिक्षण आणि संशोधन नेटवर्कचे कार्यकारी संचालक म्हणून सात वष्रे काम पाहिले. या काळात त्यांनी देशातील महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधन-सहकार्य जाळे सक्षम केले होते. एम.टेक् व पीएच.डी. असे शिक्षण झालेल्या राय यांनी सायबर कायद्यांमध्ये किंवा तंत्रज्ञान कायद्यांत बदल करण्यासाठी वेळोवेळी सूचना केल्या होत्या.  ‘इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’च्या महासंचालक पदाची धुरा स्वीकारल्यावर त्यांनी संगणकांपेक्षा देशात मोबाइलवर होणाऱ्या हल्ल्यांची अधिक भीती असल्याचे स्पष्ट केले होते. संगणकांत अ‍ॅन्टिव्हायरससारखे सुरक्षा कवच वापरून माहिती सुरक्षित ठेवता येऊ शकते. मात्र मोबाइलमध्ये अशा प्रकारची सुरक्षा वापरण्यास लोक टाळाटाळ करतात, असेही त्यांनी नमूद केले होते. मोबाइल ग्राहकांची वाढती संख्या आणि सायबर हल्ल्याचे प्रमाण लक्षात घेता ते रोखण्यासाठी चार लाख कुशल तज्ज्ञांची गरज आहे.  मात्र ही संख्या केवळ ३२ हजारच असल्याबाबतही त्यांनी २०१२ मध्येच चिंता व्यक्त केली होती. नवीन पदाची धुरा स्वीकारल्यानंतर ही स्थिती पालटेल, अशी अपेक्षा आहे.