29 May 2020

News Flash

लोकमानस

सोसेल तेवढेच सोशल नेटवर्किंग करा.. नेटवर्क चॅटमध्ये कर्मचारी फारच वेळ घालवतात असे दिसून आल्याने जगभरातील बहुतेक कार्यालयांमध्ये, कंपन्यांमध्ये व्यक्तिगत रूपाने नेट वापरण्यास (पर्सनल चॅट) बंदी घालण्यात

| November 28, 2012 10:29 am

सोसेल तेवढेच सोशल नेटवर्किंग करा..
नेटवर्क चॅटमध्ये कर्मचारी फारच वेळ घालवतात असे दिसून आल्याने जगभरातील बहुतेक कार्यालयांमध्ये, कंपन्यांमध्ये व्यक्तिगत रूपाने नेट वापरण्यास (पर्सनल चॅट) बंदी घालण्यात आली आहे. अशा वेळी हे महाभाग ऑफिसची वेळ संपल्यानंतर घरी येऊन मुलाबाळांशी किंवा पती-पत्नीशी प्रत्यक्ष गप्पा मारण्याऐवजी पुन्हा लॅपटॉप उघडून बसतात आणि कोणत्याही आभासी मित्रवर्तुळात मग्न होतात. त्यामुळे घराघरांतून किती टायपिंग कराल आणि किती वेळ त्या संगणकाशी खेळाल? असा सूर उमटू लागला आहे.
एका जागतिक सर्वेक्षणात असे दिसून            आले आहे की, एकूण ट्विटस्पैकी काही टक्के ट्विटस्ना तसा काहीही अर्थ नसतो. मग काहीतरी वरचेवर आणि बाष्कळ लिहिण्यासाठी मेंदू झिजवणे कितपत योग्य आहे?                आभासी दुनियेत अती रमण्याने जवळच्या व्यक्तींशी संबंध दुरावतात हे तर गेल्या               काही वर्षांत समाजशास्त्रज्ञही स्पष्टपणे सांगू लागले आहेत.
सोशल नेटवर्किंगचे व्यसन असेच वाढत राहिले तर काही वर्षांनी आपण प्रत्यक्ष गप्पा मारणे विसरून जाऊ की काय असे वाटू लागले आहे. सगळे नेटवरच सांगून झालेले असल्याने समोर आल्यावर बोलण्याजोगे काही शिल्लकच राहत नाही, अशी परिस्थिती जाणवू लागली आहे. तसेच बऱ्याचदा पर्सनल माहितीचा गैरवापर केला गेल्याच्या घटनाही पोलिसांनी उघडकीस आणल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या फंदात पडण्यापेक्षा आपल्या आवडत्या व्यक्तीला सरळ फोन करून त्याबरोबर मनमोकळ्या गप्पा मारा व सोसेल तेवढेच सोशल नेटवर्किंग करा.
-दादासाहेब उल्हास येंधे, काळाचौकी, मुंबई

आपण कसले निधर्मी आणि पुरोगामी ?
‘रॉ’च्या च्या संचालकपदी आलोक जोशी आणि आयबीवर सय्यद असिफ इब्राहिम या बातमीत (२६ नोव्हेंबर) लोकसत्ताच्या पुणे आवृत्तीत ‘आयबी संचालकपदी प्रथमच मुस्लीम अधिकारी’ असा उपमथळाही आहे.
‘लोकसत्ता’च्या मुंबई आवृत्तीत हा उपमथळा नाही! पण बहुतेक वृत्तपत्रांत अशाच आशयाची बातमी आलेली आहे. अगदी त्या उपमथळय़ासह. वृत्तसंस्थांनी ही बातमी दिलेली आहे. परंतु लोकसत्तासारख्या प्रबोधन पत्रातही अशी बातमी वाचून आश्चर्य वाटले. एखादी गोष्ट प्रथम होणे याला वृत्त मूल्य नक्की आहेच, पण तरीही ती आपण बातमीच्या तपशिलातसुद्धा देऊ शकला असतात.
 मुस्लीम हा या देशाच्या नागरिकांमधलाच िहदूंसारखाच एक जबाबदार व महत्त्वपूर्ण घटक आहे. आपल्या देशात अनेक सर्वोच्च पदे राष्ट्रपतीपदासह अनेक बुद्धिमान मुस्लीम धुरिणांनी भूषवली आहेत. आज स्वातंत्र्य मिळून ६५ वष्रे होऊन गेली, प्रजासत्ताक होऊन पाच दशक गेली तरी अजूनही आपण मुस्लीम म्हटले की कान टवकारतो? असे होणे हे निकोप लोकशाहीचे लक्षण नाही, आणि अशा वेळी लोकसत्तासारख्या वृत्तपत्रांनी जनमानसातील ही दरी भरून काढण्याचे काम करणे अपेक्षित आहे. मनात असा किंतु निर्माण करणारे उद्गार, उल्लेख भारतीय समाज निधर्मी बनण्याच्या प्रक्रियेला खीळ घालतात हे आपण लक्षात घ्यायला हवे .
– अनघा गोखले, मुंबई.

दिग्गीराजेंना काँग्रेसनेच आवरावे..
आपल्या बेताल आणि असंबद्ध वक्तव्याबद्दल ‘विदेशेषु मान्य: स्वदेशेषु धन्य:’ म्हणून ख्यातनाम असलेले आणि काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी पुन्हा एकदा आपली जीभ सैल सोडली. यावेळी तर ती इतकी सैल सोडली की सगळा देश त्यांच्या त्या बेशरम बरळण्यावर खवळून उठला.
त्यांनी अरविंद केजरीवाल आणि राखी सावंत यांना एका दावणीला बांधून दोघांजवळही दाखवण्यासारखे काहीही नसताना ते स्वत:ला उगाच ‘एक्स्पोज’ करत असतात, असे अत्यंत बेछूट विधान केले. यावरून दिग्गीच्या सडक्या मेंदूची साक्ष पटते. स्त्रीजातीबद्दल अश्लील विधान करणाऱ्या या महाशयांना सोनियाजींनी ताबडतोब पदावरून हाकलले पाहिजे. पण त्या कठोर पाऊल उचलतील, याची शक्यता कमीच आहे. कारण, अशा परिस्थितीत ‘रामायस्वस्ति, रावणायच स्वस्ति’ असे गुळमुळीत धोरण स्वीकारण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. दरम्यान, दिग्विजय सिंग यांना हाच सल्ला की, त्यांनी आपल्या मनमोहन सिंग यांची स्ट्रॅटेजी अंगिकारावी  म्हणजे पुढील निवडणुकीपर्यंत तरी आपला मोबाइल मनमोहन मोडवर ठेवावा, हेच त्यांच्या आणि त्यांच्या पोशिंद्यांच्या हिताचे राहील.
– रा. ना. कुळकर्णी, नागपूर

अमिताभ यांचे हे उद्गार दुर्दैवी
अभिषेक बच्चन यांना ‘गुरू’ या सिनेमासाठी कोणतेही पारितोषिक न मिळाल्याबद्दल अमिताभ यांनी ट्विटरवर खंत व्यक्त केली आहे. आपल्याला दिवार आणि दिलीपकुमार यांना गंगा जमुना यासाठीही कोणत्याही पुरस्काराने गौरवले नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, पुढे ते असेही म्हणतात की त्यावेळची परिस्थिती आणि संबंधांवरच असे पुरस्कार ठरवले जातात. पुरस्काराबद्दल अमिताभसारख्या ज्येष्ठ आणि सुसंस्कृत नटाने असले उथळ विधान करणे त्याच्या अनेक चाहत्यांना अचंबित करणारे आहे.
जर नातेसंबंधांवर पुरस्कार ठरत असतील तर आतापर्यंत या शहेनशहाला मिळालेले सर्व सन्मान असेच नातेसंबंधांतून मिळाले असे समजायचे काय? असली विधाने करून बच्चनही आपली कमावलेली प्रतिमा का मलिन करून घेत आहेत ?
 – सागर पाटील, कोल्हापूर .

पोलिसांचा बळी नाहकच!
पालघरच्या फेसबुक प्रकरणातील पोलिसांचे निलंबन झालेले वाचून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जप करणाऱ्या अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील. सरकारची हीच भूमिका असेल तर असीम त्रिवेदीवर कारवाई करणाऱ्या पोलिसांचे निलंबन का झाले नाही? हा दुटप्पीपणा कशासाठी? आधीच सी. एस. टी. िहसाचार प्रकरणात पोलिसांच्या मनोधर्याचे तीनतेरा वाजलेत. वाईट याचे वाटते की या प्रकरणात पोलिसांचा नाहक बळी दिला जात आहे.
– किरण ह. काळे, बार्शी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2012 10:29 am

Web Title: letters to editor 3
Next Stories
1 दबाव असू दे, मृत्युदंड असावाच!
2 पोलिसांवर कोणाचा दबाव होता?
3 थापाचे जबाबदारीने वागणे..
Just Now!
X