‘सरकारी नोकरभरती बंद’ ही बातमी (२९ मे)ला वाचली आणि आश्चर्य वाटले. तिजोरीत खडखडाट आहे असे सरकार म्हणते तर मग भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना झेड प्लस सुरक्षा देऊन त्यावर लाखो रुपयांचा चुराडा कारायची गरज काय? ग्रामीण भागातील खूप मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी सरळ सेवा भरतीची तयारी करतात. सरकारने ही भरती बंद केली तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. सगळ्यात जास्त कर हा महाराष्ट्रातून वसूल केला जातो. त्याचे काय होते? लाचखोर अधिकारी पकडले गेले की त्यांनी जमवलेली माया बघून डोळे फिरतात. सरकारने भ्रष्टाचार थांबवला तर अनेकांना नोकऱ्या मिळू शकतील. अनेक विभागांत कर्मचाऱ्यांना काम नाही. फक्त सह्य़ा करायच्या आणि १ तारखेला पगार घ्यायचा हेच त्यांचे काम. यावर विचार करून मार्ग काढण्याऐवजी नोकरभरतीच करायची नाही, हा पर्याय योग्य नाही.
           
उशिरा सुचलेले ‘शहाणपण’
‘क्वात्रोचीवर खटला न भरल्याने तोफा खरेदीला खीळ’ ही बातमी (३० मे) वाचली आणि करमणूक झाली. ‘‘बोफोर्स तोफांच्या खरेदीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी क्वात्रोची यांच्यावर खटला भरला गेला असता, तर सन्यदलासाठी तोफांची खरेदी गेली अनेक वष्रे थांबली नसती. ती थांबल्यामुळे सन्यदलाचे नुकसान झाले,’’ असे प्रतिपादन संरक्षणमंत्री पíरकर यांनी केल्याचे बातमीत म्हटले आहे.
 पíरकर यांना आठवण करून द्यावीशी वाटते की, १९९८ ते २००४ या काळात जवळजवळ पावणेसहा वष्रे केंद्रात वाजपेयींच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार होते. त्याचप्रमाणे, बोफोर्स प्रकरणाचा प्रसारमाध्यमांमध्ये जो गवगवा झाला, त्यामुळे १९८९ मध्ये राजीव गांधींना सत्तेतून पायउतार व्हावे लागल्यावर पंतप्रधान झालेल्या व्ही. पी. सिंग यांचे सरकार डाव्या पक्षांबरोबर भाजपच्याच टेकूवर उभे होते आणि त्या वेळी तर बोफोर्स प्रकरण धगधगत होते. याचाच अर्थ केंद्रात भाजपची स्वत:ची सत्ता असताना, तसेच भाजपच्या हातात सत्तेच्या चाव्या असताना क्वात्रोचीवर खटला भरण्याच्या दृष्टीने काहीही प्रगती होऊ शकली नाही. त्यामुळे या प्रकरणी पíरकर यांना झालेली उपरती म्हणजे उशिरा सुचलेले ‘शहाणपण’ आहे.
– संजय चिटणीस, मुंबई

लुबाडणाऱ्यांना टोलमाफी नको
शासनाने स्कूल बसेसना दिलेली टोलमाफी चुकीची आहे असे वाटते. कारण बऱ्याच बसेस या खासगी मालकीच्या असून हे मालक सतत पालकांची पिळवणूक करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून टोल घ्यायला काहीच हरकत नाही. ज्या बसेस शाळांच्या मालकीच्या आहेत त्यांना फक्त टोल माफ करावा असे सुचवावेसे वाटते.  
नुसती माफी देऊन दुवा घेण्यापेक्षा काय लायकीच्या बसेस रस्त्यावर धावतात, त्यांची वेळोवेळी तपासणी केली जाते काय, या गोष्टींकडेसुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. बेदरकार चालक, वाहनांना नसलेले दिवे, कुठल्याही प्रकारची सूचना न देता कुठेही वळणारे चालक यांना शिक्षा देण्याकरिता सरकार काय करणार आहे, याचीही सूचना जारी करावी.
 – संदीप चांदसरकर, डोंबिवली

राहुल यांचा बालिशपणा कायम
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अजूनही अपरिपक्व विधाने करून जनतेने कॉँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले हे योग्यच केले हे दर्शवीत आहेत.
नुकतेच त्यांनी संघाच्या शिस्तीची टवाळी करताना म्हटले की, ही कसली संघाची शिस्त? लोकांना रांगेत उभे करतात व जो विरोधात बोलेल त्याच्या डोक्यात काठय़ा मारतात. असले बेताल वक्तव्य करून त्यांनी दिग्विजय सिंग यांनादेखील मागे टाकले आहे? काँग्रेस अध्यक्षांविरोधात ब्र काढताच त्यास बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या संस्कृती आणि शिस्तीपेक्षा देशासाठी जीवन अर्पण करणाऱ्या स्वयंसेवकांची शिस्त समजण्यासाठी राहुल यांना आधी मातृभूमीवर प्रेम करायला शिकावे लागेल. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रधानसेवक नरेंद्र मोदींच्या भेटीवरदेखील त्यांनी कुत्सित टिप्पणी करताना म्हटले की, प्रधानसेवक हे मनमोहन सिंग यांच्याकडून अर्थशास्त्राचे धडे घेत आहेत. मोदींना  सिंग यांच्याकडून चांगले धडे घ्यायला वाईट वाटणार नाही. कारण तो त्यांचा मोठेपणा आहे आणि राजकीय द्वेषातून संघ आणि मोदींवर असंबद्ध वक्तव्य करणे हे राहुल यांच्या कोत्या बुद्धीचे प्रमाण आहे.
महेश भानुदास गोळे, कुर्ला (मुंबई)

‘भौतिक नियमांचा’ शोध घेणं एवढाच ‘मानव-विजय’?
‘मानव विजय’च्या २५ मे च्या लेखात शरद बेडेकर म्हणतात, ‘वैज्ञानिकांच्या मते भौतिक विश्वाचे काही कायमचे नियम आहेत व त्या नियमांनीच विश्वनिर्मिती झाली आहे, होत आहे. त्या भौतिक नियमांनीच विश्वातील घडामोडी चालू राहणार आहेत.’ म्हणजे १५ अब्ज वर्षांपूर्वी या विश्वाची निर्मिती झाली त्याआधीपासून हे ‘भौतिक नियम’ अस्तित्वात असणार हे उघड आहे. मग या भौतिक नियमांची निर्मिती ‘कुणाची’? वैज्ञानिकदृष्टय़ा हे विश्व ‘कशातून’ निर्माण झालं? ही ‘शून्यातून’ निर्मिती असेल तर या शून्याचा, या ‘चमत्कारा’चा अर्थ काय? मानव ज्या विज्ञानाधारे ‘अस्तित्वात असलेल्याचाच’ शोध लावत आहे, त्या विज्ञानाची निर्मिती तरी ‘कशातून’ झाली ? की ही विज्ञाननिर्मिती मूळ ‘भौतिक नियमातून’च झाली? उत्तर ‘भौतिक नियमातून’, हेच जर असेल तर या नियमांचा निर्माता ‘कुणी तरी किंवा काही तरी’ असणं आवश्यक नाही का, या प्रश्नाचं उत्तर आधुनिक विज्ञान देत नाही.  
आजवर रूढार्थानं सारेच ‘धर्म’ याच प्रश्नाचं उत्तर कुवतीनुसार देण्याचा प्रयत्न करत आले आहेत. पण त्यातही सुसंगती सोडा, टोकाची विसंगती आहे. कारण धर्मकारणाचा राजकारणासारखाच त्या त्या काळात ‘व्यवसाय’ झाला. त्यामुळे ‘सत्ताकांक्षी’ असणं हा आज सर्वच धर्माचा स्थायीभाव झाला आहे.
साहजिकच धर्माचा विज्ञानाशी संबंधच उरलेला नाही. प्रजेच्या धर्मभावनेला दुखावणं, सत्तास्पध्रेत परवडणार कसं? त्यामुळे ‘वैज्ञानिक’ विचार मांडताना धर्मातील विधानांशी तुलना वा संदर्भ, हा वेळेचा अपव्ययच ठरेल. त्यापेक्षा कुठच्याही धर्मापलीकडे (religion) असणारं ‘अध्यात्म’(spiritualism)  विज्ञानाने कसं सिद्ध करता येईल याचा शोध घेणं, हा आजच्या वैज्ञानिक प्रगतीत एका विज्ञानशाखेचा अभ्यास असला पाहिजे. जेणेकरून मूळ ‘भौतिक नियमां’कडे प्रवास सुरू होऊ शकेल. त्यासाठी ही ‘मूळ शक्ती’ म्हणजे या अवघड गणितातील ‘क्ष’ मानली तर उत्तर मिळू शकेल, पण तसं होताना दिसत नाही. कारण हा ‘क्ष’ म्हणजे सर्वसामान्यांचा ‘परम-ईश्वर’. विज्ञाननिष्ठांना या शब्दाचं वावडं, पण ‘मूळ भौतिक नियम’ मात्र मान्य. त्यामुळे विज्ञान आणि अध्यात्म एकमेकांशी पाठ करून उभे आहेत. उच्च कोटीचं विज्ञान हाताशी असताना असा अट्टहास, हा ‘आधुनिक विज्ञाननिष्ठ’ माणसाचा करंटेपणा.
दुसरा मुद्दा याच माणसाच्या अस्तित्वाचा. माणूस दहा लाख वर्षांपूर्वी माकडापासून प्रगत झाला, हा ‘वैज्ञानिक सिद्धान्त.’ या लाखो वर्षांतील माकडांच्या बहुतेक जाती-प्रजाती आजदेखील आपल्या भोवती मूळ रूपात अस्तित्वात आहेत. मग हा प्रगतीचा प्रवास फक्त माकडांच्या एका विशिष्ट प्रजातीतच झाला?  मग ‘माकड ते मानव निर्मिती’ हा ‘भौतिक नियम’, की नियम सिद्ध करणारा अपवाद? जोपर्यंत या मूळ ‘वैज्ञानिक सिद्धांताला’ कुणी पर्याय देत नाही, तो पर्यंत हेच तात्कालिक ‘वैज्ञानिक सत्य’. त्यामुळे १५ अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या जगड्व्याळ विश्वात ‘बुद्धिवान’ माणसाची इतर प्राणिमात्रांसारखी ‘स्वतंत्र निर्मिती’ का झाली नसावी, या बाबतीतदेखील आधुनिक विज्ञान उत्तर देत नाही. अस्तित्वात असलेल्याच ‘भौतिक नियमांचा’ शोध घेणं एवढाच ‘मानव-विजय’ की त्याहीपलीकडे ‘मुळाकडे’ जाणं विज्ञानाकडून अपेक्षित आहे?
प्रभाकर बोकील, मुंबई</strong>