News Flash

त्यांच्या सत्याचे प्रयोग..

आत्मचरित्रातील आरोप म्हणजे ज्याचे त्याचे सत्य आणि परपीडनाचे साधन, हा हिशेब काँग्रेस बुडू लागल्यानंतर राजकारणातही आणला जातो आहे..

| August 2, 2014 03:32 am

आत्मचरित्रातील आरोप म्हणजे ज्याचे त्याचे सत्य आणि परपीडनाचे साधन, हा हिशेब काँग्रेस बुडू लागल्यानंतर राजकारणातही आणला जातो आहे.. नटवर सिंहांच्या आत्मकथनातील आरोपांना आपणही आत्मचरित्रानेच उत्तर देणार, असे सोनिया गांधी म्हणतात, तेव्हा त्याही स्वत:च्या सत्याचेच प्रयोग इतरांवर करून दाखवणार, अशी खूणगाठ बांधली जाते ती यामुळेच..
एखादे जहाज बुडू लागले की त्याच्यातून सगळ्यात पहिल्यांदा उडय़ा मारतात ते उंदीर. यात नवे काही नाही. मात्र त्या बुडत्या जहाजावर हे उंदीर हल्लाही करतात हे अघटितच. सध्याच्या भारतीय राजकारणात नेमके तेच पाहावयास मिळत असून, ही सगळीच प्रकरणे भलतीच मनोरंजक व उद्बोधक आहेत. आधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार संजय बारू, नंतर कोळसा मंत्रालयातील माजी सचिव पी. सी. परख आणि आता कुंवर नटवर सिंह, या तिघांनीही काँग्रेसवर आपल्या पुस्तकांतून जोरदार हल्ले चढविले आहेत. यातील बारू आणि परखबाबू हे काही काँग्रेसजन नव्हेत. पण काँग्रेसच्या सत्ताछायेचा गारवा त्यांनी भोगलेला आहे. तेथे चटके बसल्यानंतर त्यांनी पुस्तके लिहून आपले मन हलके केले. कुंवर नटवर सिंह हे मात्र नखशिखान्त काँग्रेसजन. ते राजकारणात उतरले तेच गांधी घराण्याचा पदर धरून. नरसिंह रावांच्या काळात त्यांनी काँग्रेस सोडली. पुढे सोनिया गांधी यांनी पक्षावर मांड ठोकताच ते परतले. तेव्हापासून त्यांचे स्थान दहा जनपथच्या खलबतखान्यातच होते. त्या निष्ठेची पावती म्हणून त्यांना परराष्ट्रमंत्रिपद मिळाले. तसे गृहस्थ मुत्सद्दी. पूर्वी विदेशसेवेत होते. काही पुस्तकेही त्यांच्या नावावर आहेत. म्हणजे त्यांना साहित्यिकही म्हणता येईल. पण तेलाच्या भोवऱ्यात सापडले. संयुक्त राष्ट्रांनी इराकसाठी तेलाच्या बदल्यात अन्न अशी योजना आखली होती. त्यात सद्दाम हुसेन यांच्याशी हातमिळवणी करून त्यांनी आíथक घोटाळा केल्याचा आरोप झाला. त्या आरोपानुसार कुंवरसाहेबांनी हा पसा काही एकटय़ानेच खाल्ला असे नाही, तर त्यातील काही भाग काँग्रेसच्या तिजोरीतही गेला. यातून पक्षाची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी होतेय म्हटल्यावर अशा वेळी सगळेच पक्ष करतात ते काँग्रेसनेही केले. कुंवरजींची उचलबांगडी केली. नाही म्हटले तरी कुंवरजींच्या धमन्यांत राजरक्त आहे. ते उसळले. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. तोही भरसभेत. या सभेच्या प्रायोजक होत्या भाजपच्या वसुंधराराजे िशदे. पुढे कुंवरसाहेबांनी, आपले सुपुत्र जगतसिंह यांची भाजपमध्ये व्यवस्थित सोय वगरे लावून स्वत: राजकारणातून संन्यास घेतला. पण राजघराण्याचे रक्त. ते अजून तापलेलेच होते. त्या तप्तरुधिराचा आविष्कार म्हणजे कुंवरजींचे आत्मचरित्र. ‘एक आयुष्य पुरेसे नाही’ हे त्याचे नाव. शब्द हे शस्त्र असते असे म्हणतात. तसे असेल, तर हे पुस्तक म्हणजे शस्त्रसाठाच म्हणावयास हवा. तो सगळा त्यांनी सोनिया गांधी यांच्यावर डागला आहे. पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवडक वेच्यांवरून तेच दिसते.
या आत्मचरित्रात नटवर सिंह यांनी सोनिया गांधी यांच्यावर केलेले आरोप खरे की खोटे हा वादाचा मुद्दा आहे. खरे तर असे आरोप हा आजकाल श्रद्धेचाच विषय बनलेला आहे. ज्यांना त्यावर श्रद्धा ठेवायची त्यांनी ती जरूर ठेवावी. फक्त आम्ही मानतो तेच आणि तेवढेच सत्य असा दावा त्यांनी करू नये. कारण केंद्रात पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आली असती, तर कदाचित या तिघांच्या आत्मकथनांतील सत्य आणखी वेगळेच असते. अर्थात त्या वेळी अशी पुस्तके त्यांनी लिहिली असती काय हाही प्रश्नच आहे. असे असले तरी आरोपांमागील खरेखोटेपणाची चर्चा करून आपलीच बाजू वरचढ असे ज्यांना दाखवायचे आहे, त्यांनी ते खुशाल करावे. येथे ते कुटाणे करण्याची आवश्यकता नाही. पण त्याचबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे, की साधारणत: भाजपची सत्ता येणार म्हटल्यावर ज्या त्वरेने आणि हिरिरीने नरेंद्र मोदी यांचे आरतीसंग्रह बाजारात आले, त्याच त्वरेने काँग्रेसची सत्ता जाणार म्हटल्यावर सोनिया आणि मनमोहन सिंग यांच्यावर टीका करणारी ही पुस्तके बाजारात आली आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यावर हेत्वारोप होणारच. प्रथमदर्शनी तरी मानसिक सूड हाच या पुस्तकांमागील हेतू दिसतो. आपल्यावर अन्याय झाला आहे असे बारू, परख आणि नटवर सिंह या तिघाही माननीयांचे म्हणणे दिसते. सोनिया गांधी किंवा/आणि मनमोहन सिंग हे या अन्यायाला कारणीभूत आहेत, असेही त्यांचे मत दिसते. ते मांडण्यासाठी केलेला युक्तिवाद म्हणजे ही आत्मचरित्रे. याला इतिहास म्हणायचा का?
 तर नाही. वाङ्मयीनदृष्टय़ा आत्मचरित्र हा प्रकार साहित्य नव्हेच आणि तो निखळ इतिहासही नव्हे. फार फार तर इतिहासाचे एक साधन म्हणून त्याकडे पाहता येईल. याचे कारण आत्मचरित्रातील सत्य हे त्या लेखकाचे सत्य असते. तत्त्वज्ञानाच्या पातळीवर सत्याचे दोन प्रकार सांगितले जातात. सापेक्ष आणि निरपेक्ष. आकाशात सूर्य असतो हे निरपेक्ष सत्य. अशा काही गोष्टी सोडल्या तर मग बाकी असते ते सापेक्ष सत्य. बघणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असणारे. नाना बाजू असणारे. काही सत्यान्वेषी अपवाद वगळता निरपेक्ष सत्यांचा शोध आत्मचरित्रात वा आत्मकथनांतून घेतला जाणे अवघडच. कारण त्यांचा हेतूच ‘माझे सत्य’ सांगणे हा असतो. मराठीत अशा प्रकारची अनेक आत्मचरित्रे आढळतात. आरोप, टीका, कुचाळक्या, गौप्यस्फोट असा रंजक मालमसाला त्यात असल्याने ही आत्मचरित्रे लोकप्रियही होतात. त्यांचे मूल्यही तितकेच असते. पण अशी आत्मचरित्रे धोकादायकही असतात. याचे कारण त्यांतून एकांगी अर्धवट चित्र समाजासमोर जात असते. सर्वसामान्य वाचकाला तेच चित्र पूर्ण आहे असे वाटण्याची शक्यता असते. नटवर सिंह यांच्या आरोपांचा प्रतिवाद आपण पुस्तकाने करू असे सोनिया गांधी यांनी जाहीर केले. परंतु ज्यांनी नटवर सिंह यांचे पुस्तक वाचले ते उद्या सोनियांचे वाचतीलच असे नाही. त्यामुळे सोनिया यांचा प्रत्युत्तर देण्याचा हेतू कितपत साध्य होईल याबाबत शंकाच आहे. नटवर सिंह यांचे आरोप शाबीत झालेत की नाही हे दूरच राहील. ते आरोप मात्र शाबूत राहतील. आज हे सोनियांच्या बाबतीत घडत आहे. उद्या तेच अन्य कोणाच्याही बाबतीत होऊ शकेल.
याचा अर्थ कोणी कोणाबद्दल विरोधी सुरात लिहूच नये असा नाही. याचा अर्थ एवढाच, की तसे लिहिताना नसíगक न्यायाची पायमल्ली होऊ देऊ नये. आपले लिखाण हे वृत्तपत्रीय प्रसिद्धीचे नव्हे तर इतिहासाचे साधन आहे, ही भूमिका निभावली जावी. तसे होत नसेल तर केवळ आत्मप्रौढी आणि परपीडनाचे साधन एवढेच या आत्मचरित्रांचे मूल्य राहील. यात वाचकांच्या दृष्टीने धोके दोन- एक, आत्मचरित्रात सांगितले गेले तेच खरे समजून चालण्याचा आणि दुसरा त्याहीपेक्षा मोठा धोका, सारीच आत्मचरित्रे केवळ मनोरंजन म्हणून वाचण्याचा. आपल्याला असा अर्धसत्यांवर, ज्याच्या त्याच्या सत्याच्या प्रयोगांवर पोसलेला समाज हवा आहे का हा खरा प्रश्न आहे. कुंवर नटवर सिंह आदी मंडळींच्या आत्मकथनांनी तो प्रकर्षांने आपल्यासमोर आणला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 3:32 am

Web Title: sonia gandhi to give answer to natawar through autobiography
Next Stories
1 अडाण्यांचा आग्रह
2 सोप्याचे सुलभीकरण
3 बेसहारणपुराची बरखास्ती
Just Now!
X