व्रत म्हणून धार्मिक कृत्य करायचं पण त्या कृत्यामागचा हेतू व्यवहारात उतरावयचा नाही, या विसंगतीवर स्वामी स्वरूपानंद बोट ठेवतात आणि ती विसंगती दूर करणं हेच धर्माचं पुनरुज्जीवन असल्याचं सूचित करतात. धार्मिक कृत्य म्हणून सत्यनारायणाची पूजा करायची आणि व्यवहारात पावलोपावली असत्याची बाजू घ्यायची, या विसंगतीवर ते वार करतात. उलट व्यवहारात एकदा तरी सत्य बोलणं ही त्यांना सत्यनारायणाची खरी पूजा वाटते. ते म्हणतात, ‘‘अशा सत्यनारायणाच्या पूजेपुढे दंभाने आचरलेले, धर्मविधि म्हणून केलेले शेकडो सत्यनारायण तुच्छ आहेत. एवढेच नव्हे तर व्यवहारातील ती सत्यनारायणाची पूजा ऊध्र्वगतीला नेणारी आहे तर धार्मिक व्रत म्हणून केलेल्या त्या शेकडो सत्यनारायणाच्या पूजा नरकाला-अधोगतीला नेणाऱ्या आहेत.’’ आपला धर्म सर्व प्राणीमात्रांत ईश्वर आहे, असंच शिकवतो. सर्वावर दया, करुणा शिकवतो. आपण तसं वागतो का? स्वामीजी सांगतात की, शेतकऱ्यांची आणि मजुरांची स्थिती सुधारली नाही, जोपर्यंत त्यांना पोटभर अन्न आणि अंगभर वस्त्र मिळत नाही , जोपर्यंत त्यांच्या आणि त्यांच्या अर्भकांच्या आरोग्याची समाजाकडून काळजी घेतली जात नाही, तोपर्यंत त्या सुखाचा आपण उपभोग घेणे हे पाप आहे. मला स्वत:ला ही सुखे पाहिजेत तर त्यांची स्थिती सुधारण्याची जबाबदारीही माझ्यावर आहे, असंही स्वामी बजावतात. असं वास्तवात घडतं का? स्वामी म्हणतात, ‘‘आत एक आणि बाहेर दुसरेच, असा आजचा व्यवहार झाला आहे. जसजसा मनुष्य उन्नत होत जाईल तसतसा त्याच्या आचारात आणि मनोवृत्तीत पालट झाला पाहिजे.. मनुष्याने पावलोपावली आपले मन तपासले पाहिजे, अंतर शोधले पाहिजे, अंतर निर्मळ नसेल तर गळ्यात माळा आणि देहावरील भस्माचे पट्टे काय किमतीचे? अंतर निर्मळ नसेल तर रुद्राभिषेक आणि महापूजा म्हणजे निव्वळ नरकगती!’’ (स्वामी स्वरूपानंद चरित्र आणि तत्त्वज्ञान, लेखक- रा. य. परांजपे, प्रकाशक- स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस, पृ. ६२३ ते ६२८). म्हणजेच धर्माच्या आचरणानं मनुष्य हा उन्नत झाला पाहिजे, त्याच्या मनोवृत्तीत पालट झाला पाहिजे, त्याचा अंतर्बाह्य़ व्यवहार एकच झाला पाहिजे. उच्चार आणि आचार एकच झाला पाहिजे. जगण्यातली, उच्चार आणि आचारातली विसंगती संपून त्यात सुसंगती आली पाहिजे, हाच स्वामींचा बोध आहे. त्यासाठी माणसानं आत वळलं पाहिजे. आत्मस्थितीकडे वळलं पाहिजे. स्वामी याच पत्रात पुढे लिहितात की, ‘‘मनुष्याने आपले सर्व सामथ्र्य ईश्वरसेवेकडे लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पण त्यापूर्वी त्याला ईश्वराचे आणि स्वत:चे यथार्थ ज्ञान पाहिजे. ते मिळवण्यासाठी भाराभर पुस्तके वाचली पाहिजेत, असे नाही. हरघडी आपल्या प्रत्येक कृतीचा आपण विचार करायची सवय ठेवली तरीही त्या दिशेने आपली पुष्कळ प्रगती होते. मनुष्याने आपले मन तपासले पाहिजे.’’ तेव्हा धर्माची सांगड स्वामीजी प्रत्यक्ष व्यवहाराशी घालतात. किंबहुना प्रत्येक संत आणि सत्पुरुषाचा हाच बोध असतो.