News Flash

संताप आणणारी ‘हास्याची कारंजी’

‘यात्रेत हत्ती का बिथरला, मोकाट कुत्रा का चावला..’ ही बातमी (लोकसत्ता, ८ एप्रिल) वाचून संताप आला.

| April 9, 2015 12:34 pm

‘यात्रेत हत्ती का बिथरला, मोकाट कुत्रा का चावला..’ ही बातमी (लोकसत्ता, ८ एप्रिल) वाचून संताप आला. बिथरलेल्या हत्तीमुळे महिलेचा मृत्यू होणे वा मोकाट कुत्र्याने चावणे या गोष्टी तथाकथित ‘वरिष्ठ’ सभागृहाला हसण्यावारी नेण्यासारख्या वाटतात, यावरून सभागृहातील सदस्य स्वत:च मोकाट सुटल्याप्रमाणे आणि सरभर झाल्याप्रमाणे वागल्याचेच सिद्ध होते.
आमदार महोदय कुत्र्यांच्या हल्ल्यात केवळ जखमी झाले आहेत; मात्र मोकाट कुत्री चावल्याने एका बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना ताजीच घडून गेली आहे. असे असतानाही सभागृहाने हास्याची कारंजी उसळवून बळी गेलेल्या महिला आणि बालिकेचा एक प्रकारे अपमानच केला आहे. हेच लोकप्रतिनिधी आपापल्या ‘महनीय’ (?) नेत्यांची नावे रस्ते-पुलांना देण्याबाबत अथवा तत्सम फुटकळ लाळघोटेपणाची कामे करण्याबाबत नको तितके संवेदनशील असतात आणि यांच्या भावना दुखवायला एखादे क्षुद्र कारणही पुरेसे ठरते.
हे सर्व कमी म्हणून की काय, लोकसत्ता प्रतिनिधीनेही बातमीच्या सुरुवातीलाच ‘रोजच्या गंभीर चच्रेला छेद देणारे दोन प्रश्न आदळले आणि वातावरण हलकेफुलके होऊन गेले’ असे नमूद करून आपल्यालाही हे प्रश्न तितकेसे महत्त्वाचे वाटत नाहीत, हेच दाखवून दिले, ही अधिक खेदाची गोष्ट.

संकुचिताच्या चिंतनाऐवजी..
‘देहाच्या पोटी जन्माला येऊन देवाला दत्तक जाणंच या जन्मी साधायचं आहे’ हे ‘अभंगधारा’ या सदरातलं (दत्तक, ७ एप्रिल व दत्तक संस्कार, ८ एप्रिल) प्रतिपादन आवडलं. ‘देव’ म्हणजे मनाचं व्यापकत्व, बुद्धीचं व्यापकत्व असा अर्थ लक्षात घेतल्यास ‘ज्या घरी दत्तक जातो तिथले संस्कारच आपोआप होतात, तसे ‘देवा’ला दत्तक गेल्याने या संकुचित मनावर व्यापकत्वाचे संस्कार आपोआप होतील’ हा निष्कर्ष निरीश्वरवाद्यालाही मान्य होईल. मनाला जर व्यापक व्हायचं असेल तर ते संकुचिताच्या चिंतनाने साधणार नाही. म्हणजेच माणसाने देवळात बंदिस्त केलेला संकुचित देव खऱ्याखुऱ्या सर्वव्यापी परमतत्त्वाचा वेध घेण्यासाठी निरुपयोगी आहे. प्रत्येकाने आपापल्या इष्ट ‘देवा’ची निवड करून त्याला दत्तक जाणे हीच खरी भक्ती आणि या भक्तीने इच्छित फलप्राप्ती होण्याची हमी!
प्रमोद तावडे, डोंबिवली

भूमिपूजन जयंतीलाच?
भाजपने सत्तेवर येताना दादर येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले होते. १४ एप्रिलला या कामाचे भूमिपूजन करू अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय, महाराष्ट्र सरकार व राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ यांच्यात त्रिपक्षीय करार झाल्याने आता ही वचने पाळली जातील आणि इंदू मिलमध्ये लवकरच बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरू होऊ शकेल, अशी आशा बाळगावी काय?
– धोंडाप्पा नंदे, वागदरी

‘ओबीसी’मध्ये मराठय़ांचा समावेश होणे अशक्य नाही
मराठा आरक्षणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत १६ टक्के जागा न भरण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीने मराठय़ांनी निराश न होता आपली ‘ओबीसी’मध्ये समावेशाची मागणी अधिक जोराने मांडावयास हवी. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू यांनी मराठय़ांना मागास समजून मराठा जातीला १४९ क्रमांक देऊन आरक्षणाचा लाभ दिला होता. आजही हाच क्रमांक मराठा जात प्रमाणपत्रावर शासन छापत आहे. मराठा-कुणब्यांमध्ये विवाह संबंधाची हजारो उदाहरणे आहेत. दोन्ही समाजांचे रीतिरिवाज, परंपरा, व्यवसाय, देवदैवते एकच आहेत. शासकीय इच्छा असेल तर ‘ओबीसी’त समावेश नक्कीच अशक्य नाही!
– गजानन माधवराव देशमुख, परभणी

‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ राज्यातही आवश्यक
महाराष्ट्राचे नागरीकरण अत्यंत वेगाने सुरू आहे. विशेषत: ठाणे जिल्हय़ाच्या नागरीकरणाचा वेग देशात सर्वाधिक आहे. देशात फक्त ४६ शहरांतील हवा गुणवत्ता निर्देशांक यंत्रणा उभारणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने राज्यांच्या पर्यावरणमंत्र्यांच्या परिषदेत जाहीर केला आहे.
महाराष्ट्र सरकार कायम केंद्र सरकारने घेतलेल्या अनेक  निर्णयांचे अनुकरण करून, मोदी गुरुजींचे आदर्श विद्यार्थी देवेंद्रच आहे हे िबबवण्याचा प्रयत्न सुरू असतो. त्यामुळे त्याच पद्धतीत मोदींचा निर्णय राज्य सरकारने व्यापक पद्धतीने महाराष्ट्रात घ्यावा.
राज्यात ‘अ’ वर्ग नगर परिषदांना दर वर्षी पर्यावरण अहवाल देणे सध्या सक्तीचे आहे, त्याला जोडून दररोज हवा गुणवत्ता निर्देशांक जाहीर करणे सक्तीचे करावे. वायुप्रदूषणामुळे नागरिकांना होणारे घातक आजार व त्यामुळे होणारा आरोग्यावरील खर्च व राष्ट्रीय क्रयशक्ती कमी होऊन होणारे नुकसान लक्षात घेता, त्या पालिकांना ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ यंत्रणेवरील आíथक तरतूद करणे कायम फायदेशीरच ठरेल.
– मनोज वैद्य, बदलापूर (जि. ठाणे)

शरद जोशींच्या ग्रंथनिर्मितीचाही साहित्य संमेलनाला पत्ता नाही?
घुमान येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी शरद जोशींच्या कार्याची दखल घेतली नाही असा अतिशय योग्य आक्षेप गोिवद जोशी (सेलू) यांनी घेतला आहे. त्याही पुढे जाऊन मला असा प्रश्न करावासा वाटतो की, हे साहित्य संमेलन आहे. मराठीत जे कोणी लिखाण करतात त्यांची दखल घेण्याची नतिक जबाबदारी साहित्य संमेलनाची आहे. शरद जोशी हे केवळ शेतकरी नेते नसून त्यांनी या विषयावर प्रचंड लिखाण केले आहे. त्यांची १५ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या दोन पुस्तकांना (अंगारमळा, बळीचे राज्य येणार आहे) महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मग याची दखल साहित्य संमेलनाने आत्तापर्यंत का नाही घेतली?
ज्या महात्मा फुल्यांचा उल्लेख सदानंद मोरे करतात त्यांच्या ‘शेतकऱ्यांचा असूड’ या पुस्तकाला शंभर वष्रे पूर्ण झाली तेव्हा ‘शेतकऱ्याचा असूड : शतकाचा मुजरा’ ही पुस्तिका शरद जोशींनी लिहिली होती. याची नोंद मोरेंकडे का नाही? शाहू-फुले-आंबेडकरची जपमाळ ओढणाऱ्या या पुरोगामी महाराष्ट्राला ‘जातीयवादाचा भस्मासुर’ ही पुस्तिका पार १९८९ मध्येच लिहिणारे शरद जोशी माहीत नाहीत का? उठताबसता शिवाजी महाराजांचे नाव घेत छात्या फुगविणारा हा महाराष्ट्र ‘शेतकऱ्यांचा राजा शिवाजी’ लिहिणाऱ्या शरद जोशींना ओळखत नाही?
स्त्रियांच्या प्रश्नांवर फार मोठी चर्चा मराठी साहित्यात केली जाते. मग चांदवडला ३० वर्षांपूर्वी (१९८६ मध्ये) शेतकरी संघटनेने प्रचंड मोठे महिला अधिवेशन भरविले होते. त्याचे फलित म्हणजे ‘चांदवडची शिदोरी’ हे पुस्तक. महिला प्रश्नांचा वेगळ्या दृष्टीने अन्वयार्थ लावणारे शरद जोशींचे हे ग्रंथकार्य स्त्रीवादाचा अभ्यास करणाऱ्या किती समीक्षकांना, लेखिकांना माहीत आहे?
महानुभवांचे गद्य फार उशिरा उजेडात आल्याने नुकसान आपलेच झाले होते. महात्मा फुल्यांनीच पहिले मराठी नाटक लिहिले हे उशिरा कळल्याने नुकसान मराठी साहित्याचेच झाले होते. त्याप्रमाणे अजूनही शरद जोशींच्या लिखाणाची दखल न घेतल्याने नुकसान आपलेच होते आहे. तेव्हा साहित्य संमेलन भरविणारे, स्त्रियांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर साहित्य प्रसवणारे हे जितका शरद जोशींच्या लिखाणाचा दुस्वास करतील, त्याकडे दुर्लक्ष करतील, त्याची उपेक्षा करतील, तेवढे मराठी साहित्याचे नुकसान आहे.     
– रामुकाका मुळे, वैजनाथराव रसाळ, परभणी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2015 12:34 pm

Web Title: violent elephant stray dogs issues of laughter
टॅग : Stray Dogs
Next Stories
1 भाषणात शरद जोशींचा अनुल्लेख खटकणाराच
2 आकसाची शंका यावी, अशी टीका
3 अनधिकृतांचा भविष्यकाळ उज्ज्वल!
Just Now!
X