संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस, गजेंद्र चौहान वा प्रियंका चोप्रा हे बोलघेवडे सुसाट सुटले. शेवटी त्यांचे बोल ऐकणे असह्य़ झाल्याने त्यांना रोखण्याची वेळ आली..

बहुतेकांकडे सांगण्यासारखे खूप काही असते असे नाही. ते आपले बोलतच राहतात. त्याचा कुणाला उपयोग होवो, कुणाला त्याची गरज असो, याचा विचार त्यांच्या ठायी असत नाही.

डोळ्यांसमोर गर्दी आणि तोंडासमोर माइक असला, की भले भलेही उन्मनी अवस्थेत जातात! गर्दीची नशा काही और असते आणि आपलाच आवाज परत परत आपल्या कानात गुंजत राहण्याची मजा काही वेगळी असते. सत्ताधाऱ्यांना आणि राजकारण्यांना या साऱ्याची सवय असते. तेच त्यांचे सुखनिधानही असते. श्रोत्यांची तमा न बाळगता सतत बडबडणे हा त्यांचा अतिशय आवडीचा उद्योग. त्यामुळे भारतात हा शब्दखेळ सगळीकडे बजबजला आहे. राजकारण्यांचे एक सोडा, तसेही त्यांना कोणी फारसे मनावर घेत नाही. पण कलावंतालाही जेव्हा अशा मजेची चटक लागते, तेव्हा त्यांना कुणी थांबवायचे, असा प्रश्न पडतो. पुढच्या आठवडय़ात पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचा बोलघेवडेपणा काय किंवा फिल्म इन्स्टिटय़ूटच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांची बडबड काय, सारे काही स्वान्तसुखाय असले, तरीही कर्णकर्कश आणि मेंदूला झिणझिण्या आणणारे. अमेरिकेतील दूरचित्रवाणीवर पहिल्यांदाच मालिकेत भूमिका केलेली प्रियंका चोप्राही आता त्याच बोलघेवडय़ांच्या रांगेत जाऊन बसली आणि अन्य दोघांप्रमाणेच तिलाही ‘गप्प बसा’चा संदेश ऐकणे भाग पडले. तोंडची वाफ दवडायला काय लागतं, असा सवाल देशातील प्रत्येक जण एकमेकांना विचारत असतो. पण तरीही सतत बडबडत राहणाऱ्यांच्या संख्येत घट होण्याची काही चिन्हे नाहीत. चार जण जमले, की बोलण्याचा मोह अनावर होणाऱ्यांची संख्या या देशात प्रचंड आहे. ऐकणारे कमी आणि बोलणारे जास्त अशी ही अवस्था. किती बोलायचे, काय बोलायचे आणि कुठे बोलायचे याचे ताळतंत्र सुटू लागल्याचे हे लक्षण. दूरचित्रवाणीवरील बडबडय़ा संयोजकांनाही मागे टाकण्याची ही स्पर्धा तिडीक आणि संताप आणणारी अशी आहे.

बोलणे आणि बोलतच राहणे यात मोठा फरक असतो. कधी एकदा बोलतो, अशा अवस्थेतल्या माणसाला भरभरून सांगायचे असते. जे सांगायचे, ते बराच काळ तुंबून राहिलेले असते आणि सांगितल्याशिवाय राहवणारे ही नसते . पण बहुतेकांकडे सांगण्यासारखे खूप काही असते असे नाही. ते आपले बोलतच राहतात. त्याचा कुणाला उपयोग होवो, कुणाला त्याची गरज असो, याचा विचार त्यांच्या ठायी असत नाही. संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीसांची तऱ्हा तर औरच. इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राजकारण अशा सगळ्या विषयांत त्यांना प्रचंड गती. इतकी वर्षे विद्यार्थ्यांसमोर बोलून बोलूनही ते दमलेले नाहीत. या सगळ्या विषयांमध्ये त्यांचे स्वत:चे असे मत असते. त्याचा उच्चार केल्याशिवाय त्यांना राहावत नाही. अध्यापनाच्या क्षेत्रात आयुष्य घालवल्याने बोलणे हा त्यांचा जीवनधर्मच बनल्याने, तो पार पाडणे हे त्यांना आपले कर्तव्य वाटते. नीरव शांततेचा आनंद घेण्यापेक्षा कोलाहलाचा नादच त्यांना अधिक प्यारा. त्यामुळे आपण काही भरीव, संपृक्त आणि ठोस विधान करीत आहोत, अशा आविर्भावात ते सतत बोलत राहतात. अनेकांना तो बकवास वाटला, तरी त्यांना त्याची तमा नसते. अनेकदा त्यामुळे आफत ओढवते. पाकिस्तानात गेलेल्या पंतप्रधानांना सलगीचे सल्ले देता देता, इतिहासाचेही आगळेवेगळे शोध लावण्यात ते आता पटाईत झाले आहेत. त्यामुळे होणारी पंचाईत त्यांना कदाचित आवडत असावी. अनेकदा अधिकार माणसाला भ्रष्ट करतो. ‘कोण हे सबनीस,’ असा प्रश्न विचारता काय, असा त्यांचा पवित्रा असतो. ‘सांगतोच तुम्हाला’, असे त्याचे उत्तरही असते. कलावंताला हा अधिकार प्राप्त होतो तो त्याच्यामध्ये असलेल्या विशिष्ट गुणांमुळे. त्याची कला अनुभवणाऱ्या प्रत्येकाला तो आपण नियंत्रित केलेल्या एका वेगळ्या विश्वात आपल्या हुकमाप्रमाणे प्रवेश करायला लावतो आणि त्यातून त्याला एक प्रकारचा अधिकार प्राप्त होतो. कलावंताचा हा अधिकार त्याच्या कलेच्या संवर्धनासाठी उपयोगी असला, तरीही तो जेव्हा कलाबाह्य़ जगात वापरला जाऊ लागतो, तेव्हा मात्र फजिती उडते. सबनीसांचे हे असे झाले आहे.

फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये गेले अनेक महिने सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन केवळ गजेंद्र चौहान यांच्या गुणवत्तेबद्दलच्या संशयावरून आहे. हे चौहान यांनाच ठाऊक नाही, असे कसे म्हणणार? आपण आजवर जी काही अमूल्य अशी कलासेवा केली आहे, तिचे ऋण म्हणूनच आपल्या गळ्यात देशपातळीवरील एका नामांकित कला संस्थेतील महत्त्वाचे पद पडले आहे, अशी त्यांची ठाम समजूत आहे. या पदावर नियुक्ती झाल्यापासून ते जी काही मुक्ताफळे उधळीत आहेत, ती पाहता, त्यांच्यातील कलावंत कोठे आहे, याचाच शोध घेण्याची गरज वाटावी. पण तरीही त्यांचे वायफळ बडबडणे काही थांबले नाही. अखेर केंद्रीय मंत्र्यांकडूनच त्यांना गप्प बसण्याची सूचना देण्यात आली. असे घडले, याचे कारण त्यांना मिळालेला अधिकार. हा अधिकार त्यांना शासनाने देऊ केलेला आहे. तो कलावंताचा खासच नव्हे. ज्यांनी आपली नेमणूक केली त्यांनी आपल्यातील कलावंतालाच मुजरा केला, असा त्यांचा समज. तो गैर आहे, हे त्यांना जाहीरपणे सांगितले, तरीही त्यावर त्यांचा विश्वास काही बसत नाही. बहुतेक ‘महाभारत’ या मालिकेतील युधिष्ठिराच्या भूमिकेतून ते अद्यापही बाहेर आलेले दिसत नाहीत! विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल किंवा विरोधकांबद्दल वायफळ बडबड करून त्यांनी सतत प्रकाशात राहण्यातच यश मिळवले. हे यश अल्पजीवी असते, हे समजून घेण्यासाठीची वैचारिक पक्वता त्यांच्याकडे असायला हवी, असा हट्ट धरणेही त्यामुळे मूर्खपणाचे ठरावे.

बॉलीवूडमध्ये चमकणाऱ्या सगळ्यांनाच हॉलीवूडची हौस असते. तिथल्या चित्रपटांमध्ये दुय्यम किंवा तिय्यम भूमिका मिळाली, तरी ते भरून पावतात. ऐश्वर्या रायसारख्या नटीलाही असे भरून पावणे आवडते आणि त्याचा अभिमानही वाटतो. प्रियंका चोप्रासारख्या आघाडीच्या अभिनेत्रीलाही असेच वाटण्यात गैर ते काय? तिने तिथल्या दूरचित्रवाणीवरील एका मालिकेत निदान महत्त्वाची भूमिका तरी पटकावली. पदार्पणातच अमेरिकेतला ‘पीपल्स चॉइस’ हा पुरस्कार मिळाल्याने भारावून गेलेल्या प्रियंकाला तेथील बक्षिसांचा सोहळा भारतातल्या डझनभर सोहळ्यांप्रमाणेच वाटला. हिंदी चित्रपटसृष्टीतील सगळ्या कलावंतांना काही ना काही बक्षीस मिळावे, अशा उदात्त हेतूने या देशात दरवर्षी पुरस्कारांचे अनेक सोहळे होत असतात. सगळ्या तारे-तारकांना एकत्र आणून त्यांच्या हाती छोटय़ा बाहुल्या सोपवण्याचा हा कार्यक्रम हे आता वार्षिक कार्य होऊन राहिले आहे. त्यामुळे होते असे, की एकाच वर्षांत निर्माण झालेल्या वेगवेगळ्या चित्रपटांना त्या वर्षांतील सवरेत्कृष्ट चित्रपट होण्याची संधी मिळते. त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे असा पुरस्कार स्वीकारताना, आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाचा जाहीर उल्लेख करण्याचे निमित्त मिळते. पारितोषिक मिळालेल्या प्रत्येकाच्या यशात, त्याचे आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र, मैत्रिणी, निर्माता, दिग्दर्शक, सहकारी कलावंत अशा अनेकांचा हातभार लागलेलाच असतो, याची खात्री आता ते सोहळे पाहून पाहून दमलेल्या सगळ्या प्रेक्षकांना झालेली आहे. अमेरिकेत मिळालेल्या पहिल्यावहिल्या पुरस्काराच्या सोहळ्यातही प्रियंकाबाई जणू भारतातच असल्याप्रमाणे वागू लागल्या. आपल्या यशातील वाटेकऱ्यांची नावे त्या इतक्या लीलया घेत होत्या, की त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या जॉन स्टॅमस या अभिनेत्याच्या पोटात गोळा यायला वेळ लागला नाही. त्याने हसत हसत का होईना, पण कार्यक्रम दोन तासांत संपवायचा आहे, असे सांगत यशातील मानकऱ्यांची ही यादी आटोपती घेण्याचा सल्ला दिला.

हे असे घडते, याचे कारण बोलणाऱ्यांचे तोंड कुणाला थांबवता येत नाही. समर्थानी अशा बोलघेवडय़ांना मूर्खाच्या यादीत बसवले आहे. त्यांचे म्हणणे एवढेच, की ‘करी थोडे बोले फार, तो येक मूर्ख.’